अर्बन हिट आयलँड इफेक्टने नागपूरच्या उष्णतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:24+5:302021-03-04T04:14:24+5:30

नागपूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात दिसत असलेली प्रचंड वाढ नागपूरकरांच्या चिंतेचे कारण ठरले आहे. सुरुवातीलाच पारा ...

Urban heat island effect increases Nagpur's heat | अर्बन हिट आयलँड इफेक्टने नागपूरच्या उष्णतेत वाढ

अर्बन हिट आयलँड इफेक्टने नागपूरच्या उष्णतेत वाढ

Next

नागपूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात दिसत असलेली प्रचंड वाढ नागपूरकरांच्या चिंतेचे कारण ठरले आहे. सुरुवातीलाच पारा चढला आहे. मग एप्रिल, मे महिन्यांत काय हाल हाेतील, ही चिंता नागरिकांच्या चर्चेत आहे. जाणकारांच्या मते यापूर्वी उन्हाळ्याच्या सुरुवातीला एवढी तापमान वाढ नाेंदविली गेली नाही. यामागे ‘अर्बन हिट आयलँड इफेक्ट’चे कारण आहे, ही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून येणाऱ्या काळात शहरात उष्णतेच्या लाटेचा धाेका व्यक्त केला जात आहे.

साधारणत: मार्च महिना लागला की उन्हाळा सुरू हाेताे. मात्र सुरुवातीच्या काळात ३० ते ३२ अंशांवर तापमान राहते. मात्र यावर्षी पहिल्या तीन दिवसांतच तापमान ३५ अंशांच्या पार गेले आहे. बुधवारी शहरात ३७ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. हा प्रकार अर्बन हिट आयलँडचाच आहे, असा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी २००१ ते २०१७ पर्यंत केलेल्या तापमानवाढीच्या अभ्यासाच्या आधारावर देशातील प्रमुख महानगरांमध्ये यूएचआय निर्माण हाेत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये नागपूरचाही समावेश येताे. एनर्जी ॲण्ड रिसाेर्सेस इंडियानेसुद्धा देशात अर्बन हिट आयलँडचा धाेका वाढत असल्याचे आणि उपग्रह तापमान निरीक्षणाच्या आधारावर बहुतेक महानगराचे तापमान २ अंशांनी वाढल्याचे नमूद केले आहे. ही तफावत अधिक वाढल्याचे तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

अर्बन हिट आयलँड व त्याची कारणे

‘अर्बन हिट आयलॅंड’ म्हणजे सभाेवतलच्या ग्रामीण भागापेक्षा अधिक उष्ण असलेला शहरी प्रदेश हाेय.

- नागपूर शहराचा विस्तार चारही बाजूंनी हाेत आहे. त्यामुळे अधिकाधिक इमारती बांधकामामुळे सिमेंटचे जंगलच विस्तारत आहे.

- अनेक प्रकल्पांच्या विकासकामांमुळे ग्रीन कव्हर झपाट्याने घटत आहे.

- गगनचुंबी अपार्टमेंट आणि वाढते औद्याेगीकरण.

- रस्ते, पेव्हमेंट, इमारती व छप्पर बांधकामासाठी जे साहित्य वापरले जात आहे ते सूर्याची उष्णता घेऊन पुन्हा उत्सर्जित करणारे आहे.

- नैसर्गिक भूप्रदेश, वनक्षेत्र व पाणलाेट क्षेत्र नसल्याने हे साहित्य अधिक उष्णता निर्माण करते.

- अधिकाधिक सिमेंटीकरणामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता प्रचंड घटत चालली आहे. त्यामुळे सूर्याची उष्णता जमिनीत शाेषण्याची क्षमताही घटली आहे.

- वाहने आणि उद्याेगांद्वारे हाेत असलेले प्रदूषण, हवेत असलेले धुलिकण हेही माेठ्या प्रमाणात यूएचआयसाठी कारणीभूत आहे.

यूएचआयचे परिणाम

- सामान्यपेक्षा तापमानात प्रचंड वाढ हाेणे. हे प्रमाण उष्णतेच्या लाटेचे कारण ठरणारे आहे.

- उष्णतेच्या लाटेचा मनुष्य व प्राण्यांवरही विपरीत परिणाम.

- प्रदूषणाचा स्तर वाढताे. हवेच्या प्रदूषणासह जल प्रदूषणातही वाढ. भूजल पातळीत घट.

- यामुळे नागरिकांच्या आराेग्याबाबत अनेक समस्या निर्माण हाेऊ शकतात. मृत्युदरात वाढ हाेणे.

- ऊर्जेचा अधिक उपयाेग व एअर कंडिशनच्या खर्चात वाढ.

उष्ण वाऱ्यामुळे वाढले तापमान : हवामान विभाग

मात्र हवामान विभागानुसार हा प्रकार अर्बन हिट आयलँडचा नाही. विभागाचे संचालक एम. एन. साहू यांनी सांगितले, सध्या राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे मध्य भारताकडे वाहत आहेत. त्यामुळे नागपूर व विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. थंड किंवा उष्ण प्रदेशातून वाहणाऱ्या वाऱ्याचे इतर भागात परिणाम हाेतात. वाऱ्याची दिशा बदलली की आपाेआप तापमान खाली येईल, असा दावा त्यांनी केला. पुढे तापमानात अधिक वाढ हाेईल, ही शक्यताही त्यांनी नाकारली आहे.

Web Title: Urban heat island effect increases Nagpur's heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.