कन्फर्म तिकिट असूनही उर्मट प्रवाशांनी दाम्पत्याला कोचबाहेर ढकलले
By नरेश डोंगरे | Published: April 13, 2024 08:20 PM2024-04-13T20:20:18+5:302024-04-13T20:20:31+5:30
संघमित्रा एक्सप्रेसमधील प्रकार : नागपूर स्थानकावरील घटना, प्रवाशांमध्ये संताप
नागपूर : एसीचे कन्फर्म तिकिट घेऊन कोचमध्ये चढू पाहणाऱ्या एका दाम्पत्याला उर्मट प्रवाशांनी चक्क फलाटावर लोटून दिले. त्यांचे सामानही बाहेर फेकले. विशेष म्हणजे, ज्यांची जबाबदारी होती, त्या रेल्वे प्रशासनाने हतबलता दाखवत हात वर केल्याने या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. शनिवारी सकाळी ही संतापजनक घटना रेल्वे स्थानकावर घडली.
मेहर बेग अशपाक बेग हे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य जाफरनगरात राहते. त्यांची मुलगी पटना (बिहार) येथे राहते. तिची प्रकृती चांगली नसल्याने व्हीआयपी कोट्यातून या दाम्पत्याने ट्रेन नंबर १२२९५ संघमित्रा एक्सप्रेसचे एसी कोचचे कन्फर्म तिकिट मिळवले. नागपूर् स्थानकावर ही गाडी येण्याची वेळ सकाळी ८.४० ची आहे. त्यानुसार, १५ मिनिटांपूर्वी बेग दाम्पत्य रेल्वे स्थानकावर पोहचले. तासभर विलंबाने ही गाडी स्थानकावर आल्यानंतर बेग दाम्पत्य आपल्या कोचमध्ये शिरले. गाडीत प्रचंड गर्दी होती. कोच नंबर एस - ४ मध्ये त्यांच्या कन्फर्म सिट (३४ व ३५) वर दुसरेच प्रवासी बसून होते. त्यांना उतरण्याची विनंती केली असता एका प्रवाशाने सीटवरून उठण्यास नकार दिला आणि या दाम्पत्यासोबत वाद घातला.
दरम्यान, डब्याच्या दोन्ही बाजुच्या दारातून आतमध्ये शिरण्यासाठी प्रवाशांचा आटापिटा सुरू होता. सीटवर अतिक्रमण करणाऱ्या प्रवाशाने बेग यांची बॅग फलाटावर फेकली. एवढेच नव्हे तर त्याच्या सोबतच्यांनी बेग दाम्पत्यांना चक्क डब्याबाहेर काढून फलाटावर लोटून दिले. मुलगी आजारी आहे, आम्हाला अर्जंट जायचे आहे, असे हे दाम्पत्य रडून ओरडून सांगत होते. अन्य प्रवाशांनी तसेच फलाटावरील पोलिसांनी तसेच संतप्त प्रवाशांनी त्या उर्मट प्रवाशांना समजावण्याचे प्रयत्न केले. दोन दंडूकेही दिले. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. दरम्यान, संघमित्रा एक्सप्रेस फलाटावरून निघून गेली. त्यामुळे मेहर बेग यांनी रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. या अधिकाऱ्यांनी 'रुटीन जॉब'च्या अविर्भावात तक्रार नोंदवून घेतली आणि पीडित दाम्पत्याला दुसऱ्या ट्रेनने पटना येथे जाण्याचा सल्ला दिला.
साडेआठ तासानंतर मिळाली दुसरी ट्रेन
या घटनेमुळे व्यथित झालेले बेग दाम्पत्य दिवसभर रेल्वे स्थानकावर बसून राहिले. तब्बल साडेआठ तासानंतर, सायंकाळी ५.३० वाजता त्यांना पटनाला जाण्यासाठी दुसरी ट्रेन मिळाली. बागमती एक्सप्रेसची जनरल तिकिट काढून बेग दाम्पत्य मुलीकडे जाण्यासाठी रवाना झाले.
तीन दिवसांपूर्वीच घोषणा
रेल्वेतील गर्दी अन् प्रवाशांचा जीवघेणा प्रवास या संबंधिचे वृत्त लोकमतने चार दिवसांपूर्वी प्रकाशित केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी गर्दी नियंत्रणासाठी गाडी नागपूर स्थानकावर येण्यापूर्वीच बल्लापूर स्थानकावरूनच उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाची अंमलबजावणी योग्यपणे केली जात नसल्याचे आजच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
काय करतात टीसी आणि आरपीएफ ?
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला घटनास्थळी पोहचले. त्यांनी संबंधित महिला आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून जेव्हा तिकिट कन्फर्म आहे तर दुसऱ्या प्रवाशांना तेथे कुणी बसू दिले. कोचमधील टीसी आणि आरपीएफ काय करतात, असा सवाल केला.