बांधकामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:50 PM2020-02-13T22:50:56+5:302020-02-13T22:53:21+5:30
नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत केल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार सहायक मुख्य अभियंता एम. एस. बांधवकर, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्य अभियंता देबडवार यांनी विभागाचे संगणकीय सादरीकरण केले.
रस्ते, इमारतीच्या बांधकामाची बरीच कामे राज्यभरात सुरु आहेत. नागपूर विभागातील कामांची संख्याही मोठी आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या भरतीमुळे कामांना गती आली असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंत्यांनी दिली. रस्ते विकास योजनेतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत ८९.५५ टक्के काम झाले असून याबाबत भरणे यांनी समाधान व्यक्त केले.
विभागाच्या अखत्यारीतील नागपूर विभागीय प्रयोगशाळेला नॅशनल अक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टींग अॅण्ड कॅलीबरेशन लेबॉरेटरीज (एनएबीएल) चे प्रमाणपत्र मिळाल्याने विभागातील दक्षता व गुणनियंत्रण पथकाच्या कामासाठी डॉ. नितीन टोणगावकर यांचा सत्कार राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी केला.
वर्धा व चंद्रपूरच्या कामांचाही आढावा
वर्धा येथील सेवाग्राम विकास आराखडा व सैनिकी स्कूल चंद्रपूरच्या कामांची सद्यस्थिती भरणे यांनी घेतली. विभागातील एकूण ६२ विश्रामगृहाकरिता सोलर रुफटॉप करण्याचे नियोजित असून या माध्यमातून ऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धनाचा चांगला प्रयत्न होत असल्याने या कामाला गती देण्याचे निर्देश राज्यमंत्री भरणे यांनी दिले.