नागपूर : जिल्हा परिषदेतील पेन्शन घोटाळा उघडकीस आला आहे. चौकशीत यातील धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. मृत पेन्शनधारकांची रक्कम परस्पर वळती करण्यासाठी शिक्षण विभागातील महिला कनिष्ठ लिपिक सरिता नेवारे यांनी त्यांच्या मृत पतीच्या बँक खात्याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
नेवारे यांच्या पतीचा २०१९ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या खात्यासह नेवारे यांनी स्वत:चे, कुटुंबातील इतर सदस्यांचे, ओळखीच्या व्यक्तींचे विविध सहा बँकांमध्ये ही खाते असल्याचे सांगण्यात येते.
पारशिवनी पंचायत समिती अंतर्गतच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत सरिता नेवारे गेल्या २०१२ पासून सेवानिवृत्तांच्या पेन्शनचा टेबल सांभाळत होत्या. पारशिवनी पं. स. अंतर्गत सुमारे १९० वर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी असल्याने मागील १० वर्षांपासून त्या एकच टेबल सांभाळत होत्या. वास्तविक, कोणत्याही कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनंतर बदली केली जाते. विभाग बदलला नाही तर किमान टेबल तरी बदलला जातो. असे असतानाही सरिता नेवारे एकाच टेबलवर मागील दहा वर्षांपासून कार्यरत होत्या. यामुळे या प्रकरणात शिक्षण विभागातील अन्य कर्मचारी व अधिकारी सहभागी तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.
जुन्या फाईल गेल्या कुठे?
मुुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पेन्शन घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीने पारशिवनी पंचायत समितीत तपासणी करून कागदपत्रे ताब्यात घेतली. मात्र, काही जुन्या फाईल आढळून आलेल्या नाही. त्या गेल्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चार हजारांहून अधिक सेवानिवृत्त
जिल्हा परिषदेचे चार हजारांहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यातील अनेकजण मूळ पत्त्यावर वास्तव्यास नाही. अनेकांचा मृत्यू झाला. अन्य विभागातही असाच प्रकार सुरू तर नाही ना? अशी शंका पेन्शन घोटाळ्यामुळे निर्माण झाली आहे. याचा विचार करता सेवानिवृत्त कर्मचारी हयात आहेत की नाही. याची खातरजमा करून मृतकांच्या नावावर पेन्शन उचलली जाते का याचा शोध घेण्याची गरज आहे.