लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे आज सोमवारी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण महापालिका व शासकीय अशा १२२ केंद्रावर होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.
लसीकरण सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत केले जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या मनपा आणि अन्य शासकीय केंद्र मिळून १२२ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहेत. यातील कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असलेल्या १२२ केंद्रांवरून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व स्व.प्रभाकर दटके रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व. प्रभाकर दटके रोग निदान केंद्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे. ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे. त्यांना दुसरा डोस दिला जाईल.
.....
रविवारी केंद्रावरून अनेक जण परतले
लससाठा उपलब्ध न झाल्याने रविवारी मनपाची सर्व लसीकरण केंद्र बंद होते. परंतु केंद्र बंद असल्याबाबत माहिती नसल्याने अनेक जण रविवारी सकाळी डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर आले. केंद्र बंद असल्याने त्यांना परत जावे लागले. बहुतांश केंद्राबाहेर लस उपलब्ध नसल्याबाबत फलकावर माहिती लिहीली नव्हती. यामुळे संभ्रम होता.