लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:मराठीचे ज्ञानपीठ पुरस्कारविजेते व श्रेष्ठ कवी विं.दा. करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज सारा मराठी वाचक त्यांचे मन:पूर्वक स्मरण करून त्यांना आपली आदरांजली वाहणार आहे. वाङ्मयीन विश्वात अतिशय उच्च पातळीवर राहूनही आपली डावी वैचारिक भूमिका निष्ठेने जपणारा आणि तिच्याशी प्रामाणिक राहताना आयुष्यातील सारी प्रलोभने नाकारणारा त्यांच्याएवढा विरागी वृत्तीचा प्रतिभावंत महाराष्ट्रात क्वचितच दुसरा कुणी झाला असेल. त्यांच्या कवितेतील प्रतिभाविलासाने त्यांच्या वाचकांना जेवढे वेड लावले तेवढेच त्या विलासातही त्यांची वैचारिक निष्ठा तेवढीच तेजस्वी दिसल्याने ते त्यांच्या चाहत्यांच्या आदराचेही विषय झाले. विंदांचा संबंध केवळ वाङ्मयविश्वाशी नव्हता. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सर्व समाजसेवी संस्थांशी आणि उपेक्षितांच्या बाजूने लढणाºया चळवळींशीही होता. लेखक, कवी, विचारवंत व डाव्या चळवळींना आपले प्रातिभ बळ पुरविणारा कवी ही विंदांची खरी ओळख आहे. अनेक कवींची कविता त्यांच्या वजनदार वैचारिक दडपणाखाली चिरडून जाते तर काहींच्या वैचारिकतेलाच त्यांच्या प्रतिभेच्या पातळीवर ग्रहण लागलेले दिसते. विंदांच्या कवित्वाचे श्रेष्ठत्व हे की त्यांची कविता त्यांचा विचार साºया सामर्थ्यानिशी व विंदांच्या कवित्वानिशी समर्थपणे उभी राहिली. विचाराने कवितेला वा कवितेने विचाराला तीत कुठेही गौणत्व आले नाही. त्यामुळे त्यांची कविता पुढल्याही अनेक पिढ्यांना वैचारिक मार्गदर्शन देणारी आणि प्रेरणा पुरविणारी राहणार आहे.
विं. दा. करंदीकर यांच्याविषयी थोडेसे
देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
२३ ऑगस्ट १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई,एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. दा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हेसुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत. १४ मार्च २०१० साली त्यांचे निधन झाले.
विंदांचे समग्र वाङ्मय
विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणिवसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्य वाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषकांस परिचय झाला.
काव्यसंग्रह
स्वेदगंगा इ.स. १९४९
मृद्गंध इ.स. १९५४
धृपद इ.स. १९५९
जातक इ.स. १९६८
विरूपिका इ.स. १९८१
अष्टदर्शने इ.स. २००३) (या साहित्य कृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार)
संकलित काव्यसंग्रह
संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)
बालकविता संग्रह
राणीची बाग
एकदा काय झाले
सशाचे कान
एटू लोकांचा देश
परी ग परी
अजबखाना
सर्कसवाला
पिशीमावशी आणि तिची भुतावळ
अडम् तडम्
टॉप
सात एके सात
बागुलबोवा
ललित निबंध
स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)
समीक्षा
परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
उद्गार (इ.स. १९९६)
इंग्लिश समीक्षा
लिटरेचर अॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)
अनुवाद
अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
राजा लिअर (इ.स. १९७४)
पुरस्कार आणि पदवी
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान १९९१
जनस्थान पुरस्कार १९९३
कोणार्क सन्मान १९९३
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार) (इ.स. २००३)
केशवसुत पुरस्कारविद्यापीठांच्या डी.लिट्स
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक--इ.स. २०११ : विजया राजाध्यक्षइ.स. २०१२ : के.ज. पुरोहितइ.स. २०१३ : ना.धों. महानोर