नागपूर : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राजकारण तापले असताना भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हा प्रकल्प मागील सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत होते, असा आरोप करत त्यांनी या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जारी करण्याची मागणी केली आहे.
वेदान्ता-फॉक्सकॉन कंपनीसोबत चर्चा करण्याऐवजी वाटाघाटीसाठीच ठाकरे सरकारचा पाठपुरावा सुरू होता. अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारने केवळ वाट्याचाच विचार केल्याने ‘घाटा’ सोसण्यास तयार नसलेल्या कंपन्यांना महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली. मागील सरकारच्या वसुली धोरणाचा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राने धसका घेतला होता, असा आरोपदेखील त्यांनी लावला.
ठाकरे सरकारच्या काळात ओलाचा प्रकल्प अधांतरी राहिला, टेस्लाने पाठ फिरविली, एमआयडीसीमधील किती उद्योग ठाकरे सरकारच्या काळात बंद पडले, यावर संशोधन करायला हवे. दोन महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारवर आगपाखड करून आपल्या पापावर पांघरुण घालणाऱ्या मविआच्या नेत्यांनी राज्याची माफी मागितली पाहिजे, असेदेखील ते म्हणाले.