अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ग्रामपंचायत निवडणुकीचा रंगढंग कसा असेल आणि गावखेड्यातील राजकारण कुठल्या क्षणाला कोणते वळण घेईल, निवडणुकीचा बार कसा उडेल, हे सांगताच येत नाही. दावे-प्रतिदावे, राग-लोभ, आरोप-प्रत्यारोप, चटके-वेदना आणि आनंद साऱ्याच राजरंगांची उधळण या निवडणुकीत हमखास बघावयास मिळते. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीचा निकाल लागताच आणि विजयी माळ गळ्यात पडताच उमरेड तालुक्यातील नवेगाव साधू ग्रामपंचायतीचे काही सदस्य क्षणार्धात भुर्रर्र झालेत. सध्या अज्ञातस्थळी रवाना झालेले हे सदस्य ‘राजकीय’ सहलीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. अन्य ग्रामपंचायतींमध्येसुद्धा सरपंच-उपसरपंचपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी निवडणुकीचा धुरळा उडाला. आता ११ फेब्रुवारी राेजी होणाऱ्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी गट-पक्ष, कार्यकर्ते-नेते आदींची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. १४ पैकी बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये या दोन्ही पदांसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. कोणता सदस्य ऐनवेळी कुणासाठी हात उंचावेल आणि आपले मत कुणाच्या पारड्यात टाकेल, यावर तरी कुणालाही भरवसा नसल्याच्या मजेशीर बाबी यानिमित्ताने समोर येत आहेत.
निवडणुकीच्या घोषणेपासून ते निकालापर्यंत तालुक्यातील नवेगाव साधू ग्रामपंचायतीकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. या ग्रामपंचायतीमध्ये अफलातून निकाल लागताच सरपंच-उपसरपंच पदासाठीसुद्धा चुरस निर्माण झाली आहे. राज्यात आदर्श पुरस्कारप्राप्त या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ११ सदस्य निवडून पाठवायचे होते. निवडणुकीत दोन वेगवेगळे गट आमने-सामने आले. भाजपप्रणित परिवर्तन पॅनलकडे सहा, तर काॅंग्रेस समर्थित ग्रामविकास पॅनलकडे पाच सदस्य आहेत. परिवर्तनकडून राहुल नागेकर, मधु सातपुते आणि प्रभाकर धांडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ग्रामविकास आघाडीतून संजय वाघमारे यांचे एकमेव नाव आघाडीवर आहे. दोन्ही गट आपलाच सरपंच व्हावा, यासाठी सर्वशक्तीनिशी जोर लावत आहेत. ऐनवेळी कोणता निकाल लागेल, हे सध्या तरी सांगता येत नाही. निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत.
....
सत्ता कुणाच्या हाती?
उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीमध्ये ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सरपंच आणि उपसरपंचपदासाठी निवडणूक पार पडेल. याकरिता सकाळी १० ते १२ पर्यंत नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची वेळ असून, सभा सुरू असताना अथवा तत्पूर्वी उमेदवारांना अर्ज परत घेता येणार आहे. आधी सरपंच, नंतर लागलीच उपसरपंचपदासाठी निवडणूक होईल. उमरेड तालुक्यातील नवेगाव साधू, सालईराणी, चनोडा, किन्हाळा, शेडेश्वर, सावंगी खुर्द, बोरगाव लांबट, कळमना (बेला), खुर्सापार (बेला), खैरी बुटी, शिरपूर, खुर्सापार (उमरेड), विरली, मटकाझरी या १४ ग्रामपंचायतींवर सत्ता कुणाची, यावर ११ फेब्रुवारीला शिक्कामोर्तब होणार आहे. सध्या राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.