विदर्भवाद्यांच्या मतांचे विमान परत ‘क्रॅश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:04+5:302020-12-05T04:14:04+5:30

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विदर्भवाद्यांना परत एकदा ...

Vidarbha activists' plane crashes back | विदर्भवाद्यांच्या मतांचे विमान परत ‘क्रॅश’

विदर्भवाद्यांच्या मतांचे विमान परत ‘क्रॅश’

Next

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विदर्भवाद्यांना परत एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. अपक्ष उमेदवार नितीन रोंघे यांना विदर्भवादी पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला होता. मात्र प्रत्यक्षात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील तीन ‘ग्रुप्स’मधील एकूण सदस्यांइतकी मतेदेखील त्यांना मिळू शकली नाहीत. एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालांतून समोर आले. ‘सोशल मीडिया’वर मोठमोठे दावे करणारे विदर्भवादी प्रत्यक्ष लढाईच्या वेळी का माघारतात तसेच विदर्भ चळवळीचे नेमके नुकसान कोण करत आहे, हे प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.

नितीन रोंघे यांनी प्रचारादरम्यान मोठमोठे दावे केले होते. रोंघे यांना विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ राज्य पार्टी, बळीराजा पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, केंद्रीय जनविकास पार्टीने समर्थन जाहीर केले होते. याशिवाय अनेक विदर्भवादी संघटना व कार्यकर्तेदेखील त्यांच्यासोबत होते. माझ्यामुळे निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा प्रचारात आला व तोच मुद्दा महत्त्वाचा ठरेल असेदेखील ते म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र मतपत्रिकांमध्ये ना विदर्भाचा जाज्वल्य अभिमान दिसला ना विदर्भ चळवळीसंदर्भात पाठिंबा दिसून आला. नितीन रोंघे यांना केवळ ५२२ मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत तर त्यांना अवघी ६६ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीत १६२ मतांपर्यंत ते पोहोचले. विदर्भाच्या मातीत झालेल्या निवडणुकीत विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला इतकी कमी मते मिळणे, ही बाबच आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

लोकसभेतदेखील झाली होती दयनीय अवस्था

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांत विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येत विदर्भ राज्य निर्माण महामंच स्थापन केला. मात्र निकालांत मंचच्या उमेदवारांचे कुठेच अस्तित्वही जाणवले नाही. सातही जागांवरील उमेदवारांची जमानत जप्त झाली होती. बुलडाणा, गडचिरोली व यवतमाळात मंचला उमेदवार सापडलेच नव्हते.

विदर्भाचा मुद्दाच पडला मागे

राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर विदर्भाच्या आंदोलनाला गती मिळाली होती. मात्र कालांतराने हे आंदोलन ‘सोशल मीडिया’वरच मर्यादित राहिले. काही ठिकाणी तर प्रचारासाठी पुरेसे कार्यकर्तेदेखील नसल्याचे असे चित्र होते. प्रचारादरम्यान मोठ्या राजकीय पक्षांतर्फे विदर्भाचा मुद्दा बाजूलाच ठेवण्यात आला. विदर्भवाद्यांकडून विदर्भाच्या नावावर विविध आंदोलने करण्यात येतात. मात्र सातत्याने उपस्थितांची संख्या रोडावताना दिसून येत आहे. विदर्भाच्या नावावर काही संघटना प्रसिद्धी मिळवत असल्या तरी जनतेचे जास्तीत जास्त समर्थन मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न दिसून येत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीतदेखील विदर्भवादी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत हवे त्या प्रमाणात पोहोचलेच नाहीत. ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर त्यांचा भर होता. मात्र पदवीधरची निवडणूक, प्रचारतंत्र व मतदारांची मानसिकता ते समजूच शकले नाहीत.

आम्ही स्वतंत्र राज्याचा विषय जागविला : रोंघे

मागील जवळपास एका महिन्याच्या काळात आम्ही नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत प्रचार करून मते मागितली. या निवडणुकीत आम्ही विदर्भाच्या विकास आणि स्वतंत्र विदर्भ राज्य हा विषय पुनरुज्जीवित केल्याचा आम्हाला आनंद आहे. दुर्दैवाने आम्ही त्यांना मतांमध्ये परिवर्तित करू शकलो नाही, असे प्रतिपादन नितीन रोंघे यांनी केले.

Web Title: Vidarbha activists' plane crashes back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.