आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळ्यात विदर्भाचा पदरी आठ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:08 AM2020-01-22T00:08:00+5:302020-01-22T00:10:10+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचा मंगळवारी पार पडलेल्या १९व्या दीक्षांत सोहळ्यात विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ६२ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. यात विदर्भातील महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकाविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचा मंगळवारी पार पडलेल्या १९व्या दीक्षांत सोहळ्यात विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ६२ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. यात विदर्भातील महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकाविली. परंतु नामवंत महाविद्यालयाच्या तुलनेत फार कमी पदके पदरी पडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
आरोग्यविद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये घेतलेल्या दीक्षांत सोहळ्यात पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या शाखांचा ४८७२ विद्यार्थ्यांना पदवी, ५५३६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व १००१ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आला. सोहळ्यात संशोधन पूर्ण केलेल्या १४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. तर विविध शाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. यात नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील सुशांत अईलदासानी याला ‘असोसिएशन ऑफ फिजीशियन नाशिक चॅप्टर-२०११’चे सुवर्ण पदक, याच महाविद्यालयातील विजया सिंग याला ‘डॉ. कुणाल एल. महादुले’ सुवर्ण पदक, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) दीक्षा शर्मा हिला ‘विजयादेवी फडतरे स्मृती’ सुवर्ण पदक, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सुकिर्ती तिवारी हिला ‘डॉ. आय. सी. दुधानी’ सुवर्ण पदक, याच महाविद्यालयातील हर्पित कौर याला ‘डॉ. दिनेश के. दफ्तरी’ सुवर्ण पदक, एसडीकेएस डेंटल कॉलेजमधील स्वाती आनंद राय हिला ‘डॉ. आय.सी. दुधानी’ सुवर्ण पदक, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रगती बनसोड हिला ‘दलित मित्र नेत्र तज्ज्ञ डॉ. के. जी. जयस्वाल स्मृती’ सुवर्ण पदक व व्ही.एस.पी.एम कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या प्रियाल यादव याला ‘ डॉ. अली इराणी’ सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. ६२ सुवर्णपदकांमधून ही आठ पदके विदर्भातील विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत. यातही मुलींनी बाजी मारली आहे.
विशेष म्हणजे, राज्यात नामवंत असलेल्या नागपुरातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी २०१६ मध्ये नऊपेक्षा जास्त सुवर्ण पदके पटकाविली होती. परंतु यावर्षी एकही सुवर्ण पदक मिळाले नसल्याने निराशा व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा म्हणाले, दरवर्षी सुवर्ण पदके प्राप्त करण्याचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांकडून तशी तयारीही केली जाते. परंतु यावर्षी अपयश आले. पुढील वर्षी आणखी प्रयत्न केले जाईल.