लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २८ जुलै रोजी केवळ ३० मिनिटात आटोपली, हेच या आमसभेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.साधारणत: कोणत्याही संस्थेची वार्षिक आमसभा म्हटली की, बैठकीसंदर्भात सभासदांमध्ये बरेच आकर्षण असल्याचे दिसून येते. सभेमध्ये उपस्थित करावयाचे मुद्दे, मागील धोरणावर आक्षेप-टीका-दुरुस्ती आणि संस्थात्मक कार्यासंदर्भात शहर, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या विषयांवरील संस्थेची धोरणे.. असा सारा खल होत असतो. त्यातच, साहित्य विश्वात असे खल होणे म्हणजे, वर्तमानात निर्माण झालेल्या स्थितीवरून तरी सवयीचा विषय. असे असतानाही, वि.सा. संघाची आमसभा केवळ १९ पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत केवळ ३० मिनिटात आटोपली, हेच या सभेचे वैशिष्ट म्हणून अधोरेखित करावे लागेल. सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा आणि शाळांसदर्भात निर्माण झालेल्या उदासीन धोरणाबाबत वेगवेगळ्या संस्था व संघटनांकडून विषय लावून धरण्यात येत आहे. त्यात सगळ्यात पुढे अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व वि.सा. संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी आहेत. शिवाय, केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या नव्या शिक्षणाच्या मसुद्यावरही बरेच आक्षेप घेतले जात आहेत. विशेष म्हणजे, हा मसुदा मराठीसह अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेत नसल्यामुळे, हा विषय आमसभेत चर्चेत येणे अपेक्षित होते. घटनेनुसार असे मुद्दे उपस्थित करण्याचे अधिकार प्रत्येक सभासदाला आहेत. मात्र, आमसभेत या विषयांसंदर्भात ना कोणते प्रस्ताव, ठराव सादर करण्यात आले ना टीका, टिपणी किंवा निषेध व्यक्त करण्याची तसदी घेतली गेली नाही. वि.सा. संघाच्या धोरणाबाबतही कुठलाही विचार उपस्थित केला गेला नाही. सगळेच गृहित मानून अध्यक्षांनी विषय ठेवले आणि बोटावर मोजण्याइतक्या उपस्थित सदस्यांच्या मान्यतेने ते विषय मार्गी लावण्यात आले. खरे सांगायचे तर, सभासदांची उपस्थितीच तोकडी असल्याने आणि बोलणारे व मुद्दे उपस्थित करणारेच उपस्थित नसल्याने, सभा अवघ्या ३० मिनिटात आटोपण्यात आली.सभासदांना निरोप पोहोचलेच नाही!संस्थेच्या प्रत्येक सभासदाकडे वि.सा. संघाकडून काढण्यात येत असलेल्या ‘युगवाणी’ या त्रैमासिकाद्वारे संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रम व विशेष घटनेबाबत माहिती पोहोचत होती. त्रैमासिक पूर्वी नि:शुल्क पोहोचविण्यात येत असे. मात्र, आता सभासदांची संख्या प्रचंड वाढली असल्याने, त्रैमासिकाचा खर्च पेलवत नसल्याने, प्रति अंक शंभर रुपये देणगी आकारली जाते. हे मासिक प्रत्येकच सभासद घेतो असे नाही आणि त्यामुळेच, सभासदांपर्यंत आमसभेचा निरोप पोहोचला नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, स्मार्टफोनच्या काळात सभेचा निरोप पोहोचला नसावा... अशा शक्यतेला बळ मिळत नसून, सभासदांमध्ये साहित्य संघाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच उदासीनता असल्याचे दिसून येते.
विदर्भ साहित्य संघ; आमसभा आटोपली केवळ ३० मिनिटांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:45 PM
अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २८ जुलै रोजी केवळ ३० मिनिटात आटोपली, हेच या आमसभेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
ठळक मुद्देउपस्थिती नसल्यामुळे, मुद्दे मांडण्याचे औचित्यच उरले नाही