विदर्भ माझा पक्ष लढविणार जिल्हा परिषद निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:58 PM2019-11-23T23:58:46+5:302019-11-24T00:00:31+5:30
विदर्भातील तीन जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षाने जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील तीन जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षाने जाहीर केला आहे. विदर्भाचा मुद्दा अधिक वेगाने राजकीय बनविण्यासाठी आणि विदर्भासंदर्भात असलेले जनमत मतपेटीतून व्यक्त व्हावे यासाठी या निवडणुका लढविल्या जातील, असे पक्षाच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले.
यासंदर्भात माहिती देताना पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे म्हणाले, विदर्भ राज्य निर्मितीचा उद्देश डोळ्यापुढे ठेवूनच या पक्षाची स्थापना झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या कार्याची प्रेरणा यामागे आहे. वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पक्षाने प्रत्येक वेळी आपली स्पष्ट भूमिका ठेवली आहे. या वेळीही विदर्भनिर्मितीच्या उद्देशानेच फक्त विदर्भातील तिन्ही जिल्ह्यात आपला पक्ष मैदानात उतरणार आहे. बहुतेक सर्वच जागा पक्षाकडून लढल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पक्ष बळकट होणार नाही आणि मागणीसाठी भक्कमपणे पुढे येणार नाही, तोपर्यंत राज्यनिर्मितीचे वातावरण तयार होणार नाही. तेलंगणाच्या निर्मितीपूर्वी स्थानिक राजकीय पक्षांनी वारंवार निवडणुका लढविल्या. त्यातून राज्यनिर्मितीसंदर्भात असणारे जनमत स्पष्ट होत गेले. ९० ते ९५ टक्के जनता विदर्भ राज्य निर्मितीच्या बाजूने असल्याचा दावा तिरपुडे यांनी यावेळी केला. मतदानातून नागरिकांनी तो व्यक्त करावा, अशी विनंती आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका दीपक पालीवाल यांच्या नेतृत्वात तर पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष अजाबराव टाले यांच्या नेतृत्वात अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील निवडणुका लढविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक पालीवाल, बाबा कोंबाडे, मंगेश तेलंग, किरण बोरकर, संजय कटकमवार, ज्ञानेश्वर गुरव आदी उपस्थित होते.