विदर्भ निर्माण महामंच विधानसभेच्या ४० जागा लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 08:33 PM2019-08-19T20:33:31+5:302019-08-19T20:35:21+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ निर्माण महामंचची कोर कमिटीची बैठक आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर विदर्भातील ६२ पैकी ४० जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ निर्माण महामंचची कोर कमिटीची बैठक आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर विदर्भातील ६२ पैकी ४० जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. वामनराव चटप होते. या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, विदर्भ राज्य आंदोलन आघाडीचे कार्याध्यक्ष अॅड. नीरज खांदेवाले, महामंचचे समन्वयक श्रीकांत तराळ, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे अध्यक्ष राजेश काकडे, महासचिव चंद्रभान रामटेके, शंकर बर्मन, रोहित शाहू, प्रभाकर काळे, बीआरएसपीचे प्राचार्य रमेश पिसे, प्रेम म्हैसकर, हरिकिशन हटवार आदी उपस्थित होते.
विदर्भवादी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी व प्राऊटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया पार्टी या विदर्भवादी संघटनांद्वारे या ४० जागा लढविण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, रामटेक, कामठी, हिंगणा, उमरेड, नागपूर शहरातील पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर, अमरावतीमध्ये अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, तिवसा, धामणगाव, वर्धा-हिंगणघाट, आर्वी, देवळी, पुलगाव, वर्धा, यवतमाळ- वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, अकोला-बाळापूर, आकोट, पूर्व अकोला, मूर्तिजापूर, वाशीम- रिसोड, बुलडाणा-खामगाव, चिखली, सिंदखेडराजा, गडचिरोली-आरमोरी अहेरी, गोंदिया-तिरोडा, चंद्रपूर- राजुरा व वरोरा, भंडारा-भंडारा व तुमसर या जागा लढविण्यात येणार असून, पुढच्या बैठकीत कोणती संघटना कोणते मतदार संघ लढविणार, याची यादी तयार केली जाणार असल्याची माहिती समन्वयक राम नेवले यांनी दिली.