लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्य परिषदेने जाहीर केलेल्या मदतीमध्ये विदर्भाचे रंगकर्मी नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे. नाट्य परिषदेच्या लेखी विदर्भात व्यावसायिक रंगकर्मी नाहीत, असाच यातून समज निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कोरोनाच्या काळात राज्यातील गरजू रंगकर्मींसाठी १ कोटी २० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आणि ही रक्कम थेट संबंधित रंगकर्मींच्या बँक खात्यात वळती केली जाणार आहे. साधारणत: एक हजाराच्या वर रंगकर्मींची छाणनी नाट्य परिषदेने केली आहे. यात विदर्भ, मराठवाडा या भागातील रंगकर्मींचा समावेश नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अडीच महिन्यापासून टाळेबंदी आहे. त्याचा दुष्परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणेच नाट्य क्षेत्रावरही झाला आहे. बऱ्याच व्यावसायिक रंगकर्मींचा रोजगार हिरावल्यामुळे उपासमारीची वेळही आली आहे. अशा रंगकर्मींना नाट्य परिषदेने मदत जाहीर केली, हे स्तुत्य आहे. मात्र, हौशी रंगभूमीवरही पूर्णवेळ रंगकर्म करणारे अगर नाटकांवरच जीविका चालविणारे अनेक कामगार आहेत. त्यांचा विसर हेतुपुरस्सर पडल्याचे दिसून येत आहे.व्यावसायिक नाट्य कलावंत व कामगारांची स्वतंत्र संघटना असतानाही नाट्य परिषदेने पुढाकार घेऊन ही मदत जाहीर केली आहे. यात नाटकांसंबंधित अनेक संघटनांचा सहभाग आहे. नाट्य परिषद ही राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व मराठी रंगकर्मींची पालक संस्था म्हणून ओळखली जाते. मात्र, नाट्य परिषदेने आपण केवळ व्यावसायिक कलावंतांचेच पालक असल्याचे आपल्या धोरणातून जाहीर केल्याने हौशी रंगकर्मींना कुणीच वाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यात विदर्भातील नाट्य परिषदेच्या शाखांनीही हौशींचा विचार केलेला नाही. याबाबत विचारणा केली असता अशा गरजू रंगकर्मींची यादीच आपल्याजवळ नसल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून नाट्य परिषद म्हणा व नाट्य परिषदेच्या शाखा केवळ कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्या हजार गरजू रंगकर्मींमध्ये विदर्भ नाही! नाट्य परिषद करणार १ कोटी २० लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:26 AM
नाट्य परिषदेने जाहीर केलेल्या मदतीमध्ये विदर्भाचे रंगकर्मी नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे. नाट्य परिषदेच्या लेखी विदर्भात व्यावसायिक रंगकर्मी नाहीत, असाच यातून समज निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठळक मुद्देनाट्य परिषदेच्या शाखांजवळ यादीच नाही