यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे विदर्भ साहित्य संघाचे संमेलन ; अध्यक्ष सुधाकर गायधनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:12 AM2017-12-18T00:12:04+5:302017-12-18T00:14:34+5:30
विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कवी सुधाकर गायधनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कवी सुधाकर गायधनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
गायधनी यांचे सहा कवितासंग्रह, दोन आधुनिक महाकाव्य, तीन नाटके आणि अनेक नभोनाटिका प्रकाशित झाले आहेत. देवदूत हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह. त्याकरिता उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती, म.सा.प.च्या कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. विविध विद्यापीठातील अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष वणी येथील आ. संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी स्वीकारले आहे. वणी येथे होणारे हे दुसरे संमेलन आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य माधव सरपटवार यांच्या नेतृत्वात होणाºया साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीत वणी येथील कार्यकर्ते व वाङ्मयपे्रमी यांचा सहभाग राहणार आहे. विदर्भातील १५० लेखक, कवी, वक्ते सहभागी होणार असून दोन ते तीन हजार श्रोते उपस्थित राहतील, असा आयोजकांना विश्वास आहे. संमेलनासाठी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर आणि समिती आमंत्रक शुभदा फडणवीस यांचे मार्गदर्शन आहे.