स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ६ एप्रिलला ‘रेल रोको’
By admin | Published: March 6, 2017 02:02 AM2017-03-06T02:02:38+5:302017-03-06T02:02:38+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सातत्याने आंदोलन सुरू आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती : सेवाग्रामच्या आंदोलनाने वेधणार देशाचे लक्ष
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सातत्याने आंदोलन सुरू आहे. गेल्या वर्षभरात शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
या अंतर्गत जानेवारी महिन्यात विदर्भभर रास्ता रोको करण्यात आले. आता येत्या ६ एप्रिल रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सेवाग्राम येथे होणाऱ्या या रेल रोको आंदोलनाद्वारे देशाचे लक्ष विदर्भ राज्याच्या मागणीकडे वेधले जाईल, असा विश्वास समितीचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप आणि मुख्य संयोजक राम नेवले यांनी रविवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
गिरीपेठ येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यालयात कोर कमिटीची रविवारी बैठक पार पडली. अॅड. आनंदराव वंजारी हे अध्यक्षस्थानी होते. अॅड. वामनराव चटप आणि राम नेवले यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तत्पूर्वी ८ मार्चला नागभीड येथे महिला मेळावा होईल, तर एप्रिलमध्ये बेरोजगारांचा मेळावा होईल. या बैठकीत विदर्भस्तरीय कोर कमिटीचे पुनर्गठन करण्यात आले असून राजू नागुलवार यांची नागपूर शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
बैठकीला प्रबीरकुमार चक्रवर्ती, धर्मराज रेवतकर, अरुण केदार, श्याम वाघ, प्रभाकर कोहळे, अर्चना नंदघले, राजूभाऊ नागुलवार, डॉ. जी.एस. ख्वाजा, राजेंद्र ठाकूर, नीळकंठराव घवघवे, मधुसूदन हरणे, गंगाधर मुटे, तेजराव मुंडे, डॉ. रमेश गजबे, अॅड. स्नेहल ठाकरे, किशोर पोतनवार, वासुदेवराव नेवारे, रियाझ खान, प्रदीप धामणकर, पवन राऊत, अॅड. अनिल काळे, शशिकांत मानकर, विनोद भलमे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करणार तक्रार
शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना केली होती. याची आठवण करून देत अॅड. चटप यांनी सांगितले की, आजही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे १९ मार्च रोजी यवतमाळ येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर तेथे अभ्यासपूर्ण चर्चा होणार असून, मेळाव्यानंतर कार्यकर्ते यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकाकडे जाऊन मुख्यमंत्र्यांविरुद्ध ३०६ अन्वये (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल करतील.