नागपूर : पश्चिम बंगाल सरकारने राज्यात अंशत: लॉकडाऊन लावला आहे. त्यात राज्यातील सर्व शाळा, कॉलेज पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. हिच स्थिती राज्यात निर्माण होऊ शकते, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले आहेत. दरम्यान राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहत असेच कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पण लागू करण्याची शक्यता आहे असे म्हणत वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबाबतचा सूचक इशारा दिला.
१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण हे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आनंदाची बाब आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रियाही वडेट्टीवार यांनी दिली.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले असून सोमवारपासून सर्व शिक्षण संस्था बंद ठेवल्या जाणार आहेत. सर्व कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये रात्री १० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे.