ग्रामस्थांनी पकडली देशीदारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:31+5:302021-07-19T04:07:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : लाेणखैरी, खापा येथे माेठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जात असताना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : लाेणखैरी, खापा येथे माेठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जात असताना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाेलीस कारवाई करीत नाही म्हणून ग्रामस्थांनी लाेणखैरी-खापा मार्गालगतच्या शेतात देशीदारू पकडली आणि पाेलिसांना सूचना दिली. तरीही पाेलिसांनी घटनास्थळी पाेहाेचायला दिरंगाई केली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले हाेते. हा प्रकार रविवारी (दि. १८) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला.
वारंवार माहिती व तक्रारी देऊनही पाेलीस दारूविक्रेत्यांचा बंदाेबस्त करीत नसल्याने नागरिकांनी गावातील दारू पकडण्याचा निर्णय घेतला. त्यातच सरपंच लीलाधर भोयर व उपसरपंच बोधीसत्व झोडापे यांनी यांनी रविवारी दुपारी खापरखेडा पाेलिसांना फाेन करून ‘तुम्ही आमच्या गावात या, आम्ही तुम्हाला दारू पकडून देताे’ अशी माहिती दिली. मात्र, पाेलीस गावात दाखल झाले नाही.
परिणामी, ग्रामस्थांनी शक्कल लढवित लाेणखैरी-खापा मार्गालगतच्या शेतात बनावट ग्राहकाला दारूच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी पाठविल्या. ताे दारूच्या बाटल्या खरेदी करीत असतानाच दारूविक्रेत्याने नागरिकांना पाहताच दारूच्या बाटल्या शेतात साेडून पळ काढला. त्यानंतर त्यांनी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दारू पकडल्याची माहिती पाेलिसांना दिली.
पाेलीस मात्र रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. आठ ते १० किमीचा प्रवास करण्यासाठी पाेलिसांना तीन तास लागतात काय, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला. पुढे नागरिकांनी पकडलेली दारू पाेलिसांनी नाईलाजास्तव जप्त केली. ही कारवाई सरपंच लीलाधर भोयर, उपसरपंच बोधीसत्व झोडापे, पांडुरंग जामगडे, विनोद आजनकर, उत्तम घुंगसे, विजय आजनकर यांच्यासह इतर नागरिकांनी केली.
...
ठाणेदाराचे असभ्य वक्तव्य
नागरिकांनी पाेलिसांना वारंवार माहिती देऊनही पाेलीस येत नसल्याने लाेकमतचे काेराडीचे प्रतिनिधी दिनकर ठवळे यांनी खापरखेड्याचे ठाणेदार भटकर यांना फाेन करून या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यावर ठाणेदार भटकर यांनी ‘रविवार हा माझा सुट्टीचा दिवस असतो. म्हणून फोन करायची काहीच गरज नाही. सहा दिवस मी दिवस रात्र पोलीस स्टेशनमध्ये असतो.’ असे असभ्य उत्तर दिले. पाेलीस ठाण्याच्या फाेन नंबरवर काॅल करून माहिती देण्याची सूचनाही भटकर यांनी दिनकर ठवळे यांना केली हाेती.