विरेंद्र कुकरेजा यांनी नागपूर स्थायी समिती अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 03:28 PM2018-03-05T15:28:48+5:302018-03-05T15:28:57+5:30
भाजपाचे नगरसेवक विरेंद्र कुकरेजा यांनी मावळते अध्यक्ष संदीप जाधव यांच्याकडून सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे नगरसेवक विरेंद्र कुकरेजा यांनी मावळते अध्यक्ष संदीप जाधव यांच्याकडून सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलींद माने, गिरीश व्यास, परिणय फुके, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी स्थायी समितीच्या विशेष सभेत विरेंद्र कुकरेजा यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधीपक्षाकडून उमेदवारी अर्ज न आल्याने जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी सचिन कुर्वे यांनी कुकरेजा बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. सत्तापक्षाने कुकरेजा यांच्या नावाची घोषणा आधीच केली होती.
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. शासनाकडून दर महिन्याला ८५ ते ९० कोटी एलबीटी अनुदान मिळण्याची अपेक्षा होती. मात्र गत काळात एलबीटीची वसुली चांगली न झाल्याने राज्य सरकारकडून एलबीटी अनुदान कमी मिळते. परंतु महिन्याला किमान ६० कोटी मिळावे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरू आणि विकास कामाला गती देवून नागपूर शहराला स्मार्ट व ग्रीन सिटी करण्याचा संकल्प विरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी व्यक्त केला.
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ताकरापासून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. नवी मुंबई सारख्या शहरात ३ लाख मालमत्ता असुन उत्पन्न ८०० कोटी आहे. तर नागपुरात ६ लाख मालमत्ता असूनही उत्पन्न मात्र २५० कोटी होते. किमान ४०० कोटींची कर वसुली व्हावी. तसेच उत्पन्नवाढीचे नवीन स्त्रोत शोधून बाजार विभाग व जलप्रदाय विभागाच्या वसुलीतही वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. यासाठी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे कुकरेजा म्हणाले.