महापौरांची दीक्षाभूमीला भेट; विकास कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:53 PM2018-10-27T21:53:07+5:302018-10-27T21:55:00+5:30
महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या विविध १९ शहरातील महापौरांनी शनिवारी दीक्षाभूमीला भेट दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. देशातील सर्वात मोठा स्तूप म्हणून ख्याती असलेल्या दीक्षाभूमीबाबत विस्तृत माहिती यावेळी जाणून घेतली. तसेच शहरातील विविध स्थळांना भेट देऊन शहरातील विकास कामांची माहिती जाणून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या विविध १९ शहरातील महापौरांनी शनिवारी दीक्षाभूमीला भेट दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. देशातील सर्वात मोठा स्तूप म्हणून ख्याती असलेल्या दीक्षाभूमीबाबत विस्तृत माहिती यावेळी जाणून घेतली. तसेच शहरातील विविध स्थळांना भेट देऊन शहरातील विकास कामांची माहिती जाणून घेतली.
नागपूरवासीयांसाठी प्रेरणास्थळ असलेल्या व शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देऊन याबद्दलची माहिती महापौरांनी जाणून घेतली. नागपूर शहरात स्वनियंत्रण प्रणालीद्वारे नागरिकांची सुरक्षा राखणाऱ्या मनपा मुख्यालयातील ‘सिटी आॅपरेशन सेंटर’ला यावेळी महापौरांनी भेट दिली. शहरात विविध ठिकाणी सिग्नलवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरात राखली जाणारी सुरक्षा, वेळीच गरजूंना केली जाणारी मदत व नैसर्गिक आपत्तीच्यावेळी करण्यात आलेल्या सुरक्षेची संपूर्ण माहिती व्हीडीओच्या माध्यमातून नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवने यांनी यावेळी दिली.
यानंतर सर्व मान्यवरांनी देशातील सर्वात मोठे सांस्कृतिक सभागृह म्हणून नावारुपास आलेल्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाला भेट दिली. नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी सभागृहातील वैशिष्ट्यांची विस्तृत माहिती दिली
१९ महापौरांची उपस्थिती
नागपुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र महापौर परिषदेला राज्यातील १९ महापौरांनी उपस्थिती दर्शविली व शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, सांगली मिरज कूपवाडच्या महापौर संगीता खोत, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, अमरावतीचे महापौर संजय नरवणे, लातूरचे महापौर सुरेश पवार, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, मालेगावचे महापौर शेख रशीद शेख शफी, भिवंडी निजामपूरचे महापौर जावेद गुलाम मोहम्मद दळवी, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, परभणीच्या महापौर मीना बरपूडकर, जळगावच्या महापौर सीमा भोळे, कोल्हापूरच्या महापौर शोभा बोंदे, वसई विरारचे महापौर रूपेश सुदाम जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल प्रामुख्याने परिषदेला उपस्थित होते. .