ठळक मुद्देदोन महिन्यात सातबारा नावावर : ग्रामविकास राज्यमंत्र्यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा जिल्ह्यातील बेघरांना कायमस्वरुपी घरपट्टे त्वरित देण्याच्या मागणीला घेऊन ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामोरे जाऊन दोन महिन्यात बेघरांच्या नावाने सातबारा देण्याचे आश्वासन दिले.‘राहील तिथे घर व वाहील त्याला शेती’ या धोरणानुसार वर्धा जिल्ह्यातील बेघरांना (अतिक्रमणधारकांना) मोफत कायमस्वरुपी घरपट्टे देण्याच्या मागणीला घेऊन ५००वर वर्धावासी मोर्चात सहभागी झाले होते. मार्चाचे नेतृत्व ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हा अध्यक्ष पलाश उमाठे व समीर गिरी यांनी केले. या मोर्चाला माजी खासदार नाना पटोले, आ. प्रकाश गजभिये, रवींद्र कोटमकर व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत पवार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. ‘लोकमत’शी बोलताना निहाल पांडे म्हणाले, वर्धा जिल्ह्यातील बेघरांकडे पक्का रहिवासी पुरावा नसल्याने आवास योजनांचा लाभ मिळत नाही. शासकीय योजनांपासून नागरिक वंचित आहेत. कुठे ३० ते ४० तर कुठे पिढ्यान्पिढ्यांपासून अतिक्रमण करून वास्तव करणारे मजूर, कष्टकरी कामगार व शेतमजूर आहेत. कायमस्वरुपी घरपट्टे मागणीला घेऊन मार्च महिन्यात पायदळ ‘भू-देव’यात्रा काढली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यात घरपट्टे देण्याचे आश्वासन दिले. परंतु पुढे काहीच झाले नाही. यामुळे पुन्हा ‘भू-देव’ मोर्चा काढला. मुख्यमंत्री जोपर्यंत मोर्चात येणार नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असा इशारा दिला. परंतु मुख्यमंत्री विधिमंडळाच्या कामकाजात व्यस्त असल्याने त्यांच्या जागी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे मोर्चास्थळी आले. त्यांनी दोन महिन्यात बेघरांना त्यांच्या नावे सातबारा काढण्याचे व आठवडाभरात या संदर्भातील आॅनलाईन अर्ज भरण्याचे आश्वासन दिले. परंतु मागील फोल ठरलेल्या आश्वासनामुळे आम्ही त्यांना महिन्याभराचाच वेळ दिल्याचे पांडे म्हणाले. मोर्चात महिलांची संख्या सर्वाधिक होती.