रेस्टॉरंटला ग्राहकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:09 AM2021-06-09T04:09:30+5:302021-06-09T04:09:30+5:30
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लोकांमध्ये अजूनही आहे. मास्क व सॅनिटायझरवर लोकांचा जास्त भर आहे. लोक आप्तांच्या घरीही ...
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लोकांमध्ये अजूनही आहे. मास्क व सॅनिटायझरवर लोकांचा जास्त भर आहे. लोक आप्तांच्या घरीही जाण्यास टाळत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांची पावले अजूनही रेस्टॉरंटकडे वळली नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यवसाय हळूहळू रुळावर येईल, अशी मालकांना अपेक्षा आहे.
नागपुरातील धंतोली, सीताबर्डी, व्हेरायटी चौक, रामदासपेठ या भागातील १५ रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची पाहणी केली असता ग्राहकांच्या उपस्थितीची सत्यस्थिती पुढे आली. व्हेरायटी चौकातील पाच ते सहा रेस्टॉरंटमध्ये ग्राहक दिसले नाहीत. धंतोली येथील गणेशसागर, क्रेझी बाईट या रेस्टॉरंटमध्ये एरवीपेक्षा फारच कमी ग्राहक होते. गणेशसागरचे व्यवस्थापक म्हणाले, पूर्वी ८.३० नंतर ग्राहक प्रतीक्षेत राहायचे. पण आता अर्ध्यापेक्षा जास्त टेबल रिक्त आहेत. सध्या नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मर्यादित कुटुंबे रेस्टॉरंटमध्ये येतात. राज्य शासनाने अनलॉक करताना घोषित केलेल्या ५० टक्के उपस्थितीच्या नियमांचे पालन करीत आहेत. पण त्यापेक्षाही कमी ग्राहक येत आहेत. पुढे ग्राहक वाढतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय रामदासपेठ येथील तीन हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते. ग्राहक येण्याची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवसाय सुरळीत होण्यास वेळ लागणार
नागपूर रेशिडेन्सियल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय सुरळीत होण्यास काही दिवस लागतील. भीतीमुळे लोक सध्या रेस्टॉरंटमध्ये जात नाहीत. शिवाय बाहेरचे लोक नागपुरात येत नसल्याने हॉटेल्समधील रूम्स रिकाम्या आहेत. अनलॉकनंतर रेस्टॉरंटमध्ये अर्धेच कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांना हळूहळू बोलविण्यात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे हॉटेल व रेस्टॉरंट कोरोना काळात पूर्णवेळ बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात हॉटेल्स व रेस्टॉरंटला नोटिशी आल्या आहेत. त्यामुळे रात्री १० वाजता रेस्टॉरंट बंद होणार आहे. गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील हॉटेल्स व रेस्टॉरंटला प्रॉपर्टी करात एक वर्षाची सूट आणि विजेच्या फिक्स आधार शुल्कात सवलत द्यावी. याशिवाय घोषणेनुसार राज्य शासनाने हॉटेल इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा द्यावा.