तीन झाडात अडकले प्रतीक्षालय

By admin | Published: January 3, 2017 02:50 AM2017-01-03T02:50:43+5:302017-01-03T02:50:43+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. बिछान्यावरील रुग्ण उठून उभा होईल या आशेवर

Waiting room stuck in three trees | तीन झाडात अडकले प्रतीक्षालय

तीन झाडात अडकले प्रतीक्षालय

Next

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : झाड कापण्यासाठी हवी मंजुरी
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. बिछान्यावरील रुग्ण उठून उभा होईल या आशेवर रुग्णाचे नातेवाईक उघड्यावर राहून दिवस-रात्र एक करीत आहे. त्यांच्या सोयीसाठी प्रतीक्षालयाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. एका सामाजिक संस्थेने आर्थिक मदतीचा हातही दिला. परंतु प्रतीक्षालयाच्या प्रस्तावित जागेवरील केवळ तीन झाडे अडसर ठरत आहे. ही झाडे तोडण्यासाठी नियमानुसार महापालिकेच्या तिजोरीत अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णाचे नातेवाईक अडचणीत आले आहेत.
विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ मध्ये रुग्ण येतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत २५ हजार ९७६ रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच आंतररुग्णांतही वाढ झाली आहे. परंतु प्रतीक्षालय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणीचे जात आहे. याची दखल विशेष कार्यअधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी घेऊन प्रतीक्षालयाचा प्रस्ताव तयार केला. या बांधकामासाठी सुमारे २१ लाख रुपयांचा खर्च येणार होता. यासाठी त्यांनी काही सामाजिक संस्थांना मदत मागितली.
त्याला प्रतिसाद देत रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्यच्या नागपूर शाखेने प्रतीक्षालय बांधून देण्याची तयारी दर्शविली. परंतु खासगी संस्थेकडून शासकीय परिसरात बांधकाम होणार असल्याने मान्यतेला वर्ष लागले. अनेक अटी व त्याच्या पूर्ततेनंतर ११ जुलै २०१६ रोजी मान्यता मिळाली.
४० बाय ५० चौरस फुटाच्या प्रतीक्षालयात महिला आणि पुरुषांसाठी असे स्वतंत्र दोन कक्ष उभे राहणार आहेत. या प्रतीक्षालयामुळे दूरवरून नागपुरात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना किमान उपचारादरम्यान डोके झाकायला निवारा मिळणार आहे. याचे बांधकाम आता सुरूच होणार होते तर प्रस्तावित जागेवरील तीन झाडे अडसर ठरली.
रुग्णालय प्रशासनाने नियमानुसार झाडे कापण्यासाठी मनपाकडे मंजुरी मागितली आहे. मनपाने २२ हजार रुपये अनामत रक्कम भरुन तीन झाडांच्या बदल्यात ३० झाडे लावण्याची सूचना केली आहे. ही झाडे जगल्यास ही अनामत रक्कम परत मिळते.
विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने गेल्या काही महिन्यातच ३० वर झाडे लावली आहे. असे असतानाही निधी उपलब्ध करण्यात लालफितशाही आडवी येत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आणखी काही दिवस उघड्यावर काढावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting room stuck in three trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.