नागपूर : गुरुवारी दुपारी नागपुरात पावसाने जाेरदार धडक दिली. तासभर धाे धाे बरसलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सखल भागातील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले हाेते, तर अनेक भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहतुकीचा खाेळंबा निर्माण झाला हाेता. मान्सूनचे शेवटचे दिवस असले तरी थाेडा वेळाच्या पावसाने महापालिकेच्या व्यवस्थेचा बाेजवारा उडाला.
गेल्या काही दिवसात पावसाने चांगलाच मुक्काम केला आहे. तरीही उघडझाप सुरू असून, थाेडी उसंत देत पावसाची हजेरी लागत आहे. हा ऊनसावलीचा खेळ गुरुवारीही झाला. सकाळपासून आकाश निरभ्र हाेते व ऊनही पडले हाेते. त्यामुळे लाेकांना उष्णतेचा त्रासही झाला. मात्र दुपारी १.३० वाजेनंतर वातावरण अचानक बदलले आणि आकाशात काळे ढग जमा झाले. दुपारी २ वाजता ढगांच्या गडगडाटासह जाेरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील बहुतेक भागात किमान तासभर धाे-धाे पाऊस बरसला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात ३४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
- जाेरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मेडिकल चाैक, तुकडाेजी चाैक, मानेवाडा चाैकात पाणी रस्त्यावरून वाहत हाेते. महाल व नंदनवन भागात काही ठिकाणी पावसाचे पाणी वाहत हाेते.
- जाटतराेडी परिसरात काहींच्या घरात पाणी शिरल्याची माहिती आहे. चिमणी चाैक, रामेश्वरी परिसरात माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. याशिवाय प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, गाेपालनगर व आसपासच्या परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत हाेते.
- पडाेळे चाैक ते राधेमंगलम सभागृहापर्यंत बसस्थानकाच्या बसण्याच्या पाटीपर्यंत पाणी चढले हाेते. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली हाेती.
- बजाजनगर, काछीपुरा चाैकात भागात रस्त्यावर वाहनांची चाके बुडतील एवढे पाणी साचले हाेते. स्वावलंबीनगर, भेंडे ले-आउट, खामला टी-पाॅइंट आदी भागातही रस्त्यावर पाणी वाहत हाेते. त्यामुळे तास-दीड तास वाहतूक विस्कळीत झाली.
नरेंद्रनगर पुलाखाली तलावच
- नरेंद्रनगर रेल्वे पुलाखाली हाेणारी दुर्दशा थांबण्याची शक्यता दिसून येत नाही. दरवेळी पावसाळ्यात पुलाखाली तलावासारखे पाणी जमा झालेले असते. गुरुवारीही हीच दशा हाेती. वाहने बुडण्याएवढे पाणी साचले हाेते. त्यामुळे काही काळ वाहतूकच बंद करावी लागली. पाऊस बंद झाल्यावर बराच वेळ तशीच परिस्थिती हाेती. त्यानंतर वाहतूक सुरू झाली; पण वाहनचालकांना काठाकठाने वाहने काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते.