नागपूर शहरात जलसंकट, चर्चा बॉटलबंद पाणी विकण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:03 AM2019-06-04T11:03:40+5:302019-06-04T11:05:06+5:30
शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, ही महापालिकेची जबाबदारी व कर्तव्य आहे. यामोबदल्यात नागरिकांकडून करसुद्धा घेतला जातो. परंतु आता मनपा बॉटलबंद पाणी विकण्याची तयारी करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, ही महापालिकेची जबाबदारी व कर्तव्य आहे. यामोबदल्यात नागरिकांकडून करसुद्धा घेतला जातो. परंतु आता मनपा बॉटलबंद पाणी विकण्याची तयारी करीत आहे. यासाठी बॉटलिंंग प्लान्ट प्रकल्प तयार केला जाणार आहे. संबंधित प्रस्तावित प्रकल्पाचा आढावा एक सदस्यीय समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी घेतला.
मनपा प्रशासनाचा असा दावा आहे की, संबंधित प्रकल्पाच्या भरवशावर पाणीपुरवठा विभागातील विजेचा खर्च ५० टक्के कमी होईल. तसेच हा प्रकल्प सौर ऊर्जेवर चालवला गेला तर आणखी ५० टक्के फायदा होईल. विशेष म्हणजे प्रवीण दटके हे जेव्हा महापौर होते, तेव्हा त्यांनीच बॉटलिंग प्लान्ट टाकण्याचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी मनपाच्या या प्रकल्पात तयार होणारे पाणी रेल्वे घेण्यासाठी तयार होते. परंतु नंतर या प्रकल्पाची फाईल पडून राहिली. इतकेच नव्हे तर नागरिकांना हे पाणी स्वस्त किमतीतही उपलब्ध करण्याची तयारी होती. प्रवीण दटके यांनी संबंधित प्रकल्पातील अडचणी दूर करून प्रकल्पाला लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, आयुक्त अभिजित बांगर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अजीज शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहसंचालक नगर रचना प्रमोद गावंडे आदी उपस्थित होते.
दटके समितीची उपयोगिता काय?
प्रलंबित प्रकल्पाला गती देण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी माजी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठित केली आहे. समितीचे काम जितकेही महत्त्वाचे प्रकल्प आहेत, त्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करणे हे आहे. परंतु समितीच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. समितीच्या अध्यक्षाच्या नात्याने दटके वारंवार बैठकी घेतात. दिशानिर्देश देतात. परंतु त्याचे पालन प्रशासन करीतच नाही. तसेच एकाही मोठ्या प्रकल्पाला समितीने आपल्या देखरेखीत रेकॉर्ड वेळेत पूर्ण केलेले नाही. महिना-दोन महिन्यात बैठक घेऊन खानापूर्ती केली जाते. त्यानंतर सर्व शांत बसतात.
एलईडीची डेडलाईनच चुकली
शहरात सर्वत्र पथदिव्यांवर एलईडी लाईट लावण्याची डेडलाईनसुद्धा निघून गेली आहे. समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी ही डेडलाईन मे २०१९ निश्चित केली होती. जून महिना सुरू झाला आहे. परंतु अजूनही एलईडी लाईट लावले गेलेले नाहीत. केवळ सतरंजीपुरा झोनमध्येच शंभर टक्के एलईडी लाईट लावण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु उर्वरित झोनमधील परिस्थिती चांगली नाही. प्रवीण दटके यांनी १५ दिवसात एलईडी लावण्याचे निर्देश दिले आहेत.
सिमेंट रोड ठरताहेत डोकेदुखी
सिमेंट रोडच्य कामांमुळे सत्तापक्ष भाजप आणि मनपा प्रशासन आपली पाठ स्वत:च थोपटून घेत आहेत. परंतु नागरिकांसाठी मात्र सिमेंट रोडची कामे डोकेदुखी ठरत आहेत. उन्हात सिमेंट रोडवरून जाणाऱ्या नागरिकांना दोन डिग्री तापमान जास्तीचे सहन करावे लागत आहे. पाणी साचण्याची समस्याही निर्माण होत आहे. पहिल्या आणि दुसºया टप्प्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही, तरी तिसºया टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सिमेंट रोडची उर्वरित कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहे. याशिवाय बाजार विकासाच्या रखडलेल्या प्रकल्पावरही यावेळी चर्चा करण्यात आली.