हजार कोटींच्या कुलर व्यवसायावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:06+5:302021-04-08T04:09:06+5:30
नागपूर : राज्य शासनाच्या ३० एप्रिलपर्यंतच्या कडक निर्बंधांमुळे कुलर उत्पादक आणि विक्रेते संकटात आले आहेत. कुलरची विक्री मार्चच्या अखेरच्या ...
नागपूर : राज्य शासनाच्या ३० एप्रिलपर्यंतच्या कडक निर्बंधांमुळे कुलर उत्पादक आणि विक्रेते संकटात आले आहेत. कुलरची विक्री मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. पण आता दुकाने बंद असल्याने कुलरची विक्री कशी करायची, अशी चिंता उत्पादक आणि विक्रेत्यांना सतावत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही एक हजार कोटींच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागणार असल्याची भीती उत्पादक आणि विक्रेते व्यक्त करीत आहेत.
नागपूर कुलरसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ५०० पेक्षा जास्त उत्पादक आहेत. या व्यवसायाशी १० हजारांपेक्षा जास्त लोक जुळले आहेत. या व्यवसायात अप्रत्यक्षपणे इलेक्ट्रिशियन, वूडवूल विक्रेते, नवीन व जुने मोटर पंप विक्री करणारे, पाण्याची टाकी विक्रेते, देखभाल करणारे आदी जुळले आहेत. पण आता कुलर उत्पादक व विक्रीची दुकाने बंद असल्याने सध्या सर्वच बेरोजगार झाले आहेत.
नागपुरातून नागपूर जिल्हा, विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाना या राज्यात कुलर विक्रीसाठी जातात. लॉकडाऊनमुळे मालाची जावक बंद झाली आहे. उत्पादकांकडे हजारो संख्येत कुलर पडून आहेत. त्यात गेल्यावर्षीच्या कुलरची भर पडली आहे.
राम कुलरचे संचालक राजेश अवचट म्हणाले, नागपूर कुलर निर्मिती आणि विक्रीसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ५०० उत्पादकांच्या माध्यमातून दरवर्षी उन्हाळ्यात ६ ते ८ लाख कुलरची विक्री होते. स्थानिकांसह ब्रॅण्डेड कंपन्यांच्या कुलरची विक्री होते. पण सध्या स्थानिक उत्पादकांनी ब्रॅण्डेड कंपन्यांवर मात केली आहे. सध्या उत्पादन आणि विक्री बंद झाली आहे. ऑनलाईन विक्री केवळ १० ते २० टक्केच आहे. अशीच स्थिती काही दिवस राहिल्यास निर्मितीची साखळी तुटून त्यांच्या आर्थिक संकट येणार आहे. कर्जाची परतफेड करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन हटवावे, अशी मागणी उत्पादक व विक्रेत्यांची आहे.
- नागपूर जिल्हात जवळपास ५०० उत्पादक
- एक हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल
- ५ हजारांपेक्षा जास्त विक्रेते
- १० हजार लोकांना रोजगार
एसीची विक्री थांबली
श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर म्हणाले मार्चअखेरपासून मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व कंपन्यांच्या एसीची ८० टक्के विक्री होते. हा व्यवसाय कोट्यवधींचा असतो. सध्या सर्व माल पडून आहे. कंपन्यांनी पैसे वसुलीचा तगादा लावला आहे. ते परत कसे करायचे, ही चिंता आहे. बँकेच्या कर्ज, व्याज, कर्मचाऱ्यांना पगार द्यावे लागेल. आता सर्वच विक्रेत्यांना ऑनलाईन विक्रीचा मार्ग पत्करावा लागणार आहे. सरकारने लॉकडाऊन हटवून इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांना दिलासा द्यावा.