नागपूर : डिझेलची दरवाढ झाल्याने स्टार बस अडचणीत आली असताना आता स्कूल बस चालकांनी आपल्या वाहनांच्या माध्यमातून सेवेचा पर्याय सुचविला आहे. आयुक्त आणि प्रशासनाने परवानगी दिल्यास मनपाचा ३.१३ कोटींचा तोटा दूर करण्यासोबतच स्वत:च्याही रोजगाराचे साधन उभे करू, असा हा पर्याय आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक व्यवसाय बचाव संघर्ष समितीने हा पर्याय दिला आहे. मागील १७ महिन्यांपासून कोरोना संक्रमणामुळे शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या स्कूल बसेसही ठप्प आहेत. नागपूर शहरामध्ये ४०० ते ५०० स्कूलबस (३० सीटर) आहेत. तर ४३८ स्टार बसेस आहेत. डिझेलचे दर वाढल्याने प्रतिकिलोमीटर खर्चात वाढ झाली. यामुळे एका बसमागे २०० रुपयांचा खर्च वाढला आहे. यामुळे मनपाला वार्षिक ३.१३ कोटी रुपयांचा फटका बसत आहे.
...
स्कूल बस मालक म्हणातात, आमच्या बसचे ॲव्हरेज जास्त
स्टार बसचा एका किलोमीटरमागील खर्च आता ६२ रुपयांवर गेला आहे. दरवाढीपूर्वी तो ६० रुपयांवर होता. स्कूल बस चालकांच्या मते त्यांच्या बसेसचा ॲव्हरेज जास्त असल्याने आणि स्वत: मालकच नियंत्रित करीत असल्याने प्रतिकिलोमीटर १३ रुपयांचा खर्च पडेल. यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवर ताण येणार नाही. व्हेंडरचा खर्चही यामुळे वाचेल, असा दावा चंद्रकांत जंगले यांनी केला आहे.
...
संधी तर द्या...
‘लोकमत’शी बोलताना शालेय विद्यार्थी वाहतूक व्यवसाय बचाव संघर्ष समितीचे संयोजक चंद्रकांत जंगले म्हणाले, लॉकडाऊनमध्ये स्कूल बसेस उभ्या असल्याने बस मालकांचे कंबरडे मोडले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे अनेकदा विनंती केली आहे. शहर प्रवासी वाहतूक सेवेसाठी काम कारण्याची आमची तयार आहे. यासंदर्भात आरटीओंकडे आणि प्रशासनाकडे निवेदनही दिले आहे. आम्हाला एकदा संधी द्यावी. यातून महानगरपालिका आणि आम्हा बस मालकांना आधार मिळेल.
...