Weather Update: पहाटेचा गारवा कमी, दुपारचे उन वाढेल; हवामान खात्याचा अंदाज
By निशांत वानखेडे | Published: November 6, 2023 04:20 PM2023-11-06T16:20:04+5:302023-11-06T16:24:55+5:30
चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता
नागपूर : चंद्रपूरसह विदर्भातील काही भागात पुढचे तीन-चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढचे काही दिवस पहाटेचा गारवा कमी होवून दुपारचे कमाल तापमान काही अंशी अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
चार दिवसाच्या कालावधीत अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थितीतून कमी दाब क्षेत्राची निर्मिती होवु शकते. परंतु महाराष्ट्रात साधारण २० नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही पावसाची शक्यता जाणवत नाही. शुक्रवार १० नोव्हेंबर पासून पुन्हा हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होवून दुपारचे कमाल तापमानही सामान्य राहण्याची शक्यता जाणवते.
दरम्यान नोव्हेंबरचा पहिला आठवडा सर्वसाधारण ठरला. थंडीत फार वाढ झाली नसली तरी दिवसाचा तापही जाणवला नाही. २४ तासात नागपूरच्या कमाल तापमानात अंशत: घट झाली व ३२.१ अंश नोंद झाली पण ते सरासरीपेक्षा अंशत: अधिक आहे. रात्रीचा पारा मात्र घटला आहे. नागपूरसह गोंदिया, वाशिम, यवतमाळ या शहरात रात्रीचा पारा १५ अंशाच्यावर आहे व सरासरीच्या खाली आहे. किमान तापमान चंद्रपुरात सर्वाधिक १९ अंश आहे, तर अमरावती, गडचिरोलीत १७ अंशावर आहे. अकोला, वर्धा १६.५ अंशावर आहेत. दिवसाचे तापमान मात्र सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा वर गेले आहे. अकोला सर्वाधिक ३४ अंशावर तर इतर शहरात कमाल पारा ३२ अंशावर आहे. त्यामुळे मध्यरात्री गारठा जाणवतो पण पहाटेपासून थंडी कमी होत जाते. विदर्भात १० नोव्हेंबरपासून थंडीत वाढ होईल, असा अंदाज आहे.