नागपूर : लग्नसमारंभावर पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचे विरजण पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोना प्रोटोकॉल पुन्हा एकदा जारी झालेले आहेत. कोरोनाचा ओमायक्रॉन नावाचा नवा विषाणू डोक्यावर थयथय नाचण्यास सज्ज झाला आहे. असे असतानाही वर-वधूंच्या आनंदाचे सोहळे सुसाट सुरू असल्याचे दिसून येत आहेत.
सहा महिन्यापूर्वी कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरली आणि शासनासकट समस्त नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. हळूहळू संक्रमणाचा अंदाज घेत शासनाने टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवणे सुरू केले आणि संपूर्ण अनलॉक जाहीर झाले. यामुळे कोरोना संक्रमणाच्या प्रभावाने रखडलेले अनेक वर-वधूंच्या विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर बिनदिक्कत संमती प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने हे सोहळे जल्लोषात साजरे करण्याची तयारीही संबंधितांकडून सुरू झाली. हॉल बुक केले गेले, शेकडो-हजारोच्या संख्येने पत्रिका वाटण्यात आल्या. जेवणाचे स्वयंपाकी व कॅटरर्सला ऑर्डर देण्यात आले. ॲडव्हान्स म्हणून तर काही गोष्टींसाठी पूर्ण रक्कम अदाही करण्यात आली. ही सगळी लगबग सुरू असतानाच ओमायक्रॉनचे संकट उभे झाले आणि धोक्याची पूर्वसुचना म्हणून शासनाने पुन्हा निर्बंध सुरू केले आहेत. पत्रिका वाटल्यानंतर आता कुणाला येऊ नका म्हणावे, हा मोठा गहन प्रश्न आयोजकांना पडला आहे. त्यामुळे, निर्बंधानंतरही उपस्थितांच्या मोठ्या संख्येत विवाह सोहळे साजरे होताना दिसत आहेत.
बंदिस्त सभागृहात १०० पेक्षा जास्त नको
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशान्वये स्थानिक जिल्हा प्रशासनाने बंदिस्त सभागृहात आयोजित लग्न सोहळ्यांमध्ये केवळ ५ टक्के म्हणजे १०० आमंत्रितांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
खुल्या जागेत २५ टक्के
सभागृह वगळता मैदानात किंवा खुल्या जागेत विवाह सोहळे आटोपण्यासाठी केवळ २५ टक्के म्हणजे जास्तीत जास्त २५० आमंत्रितांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
ग्रामीण भागात वेळेचे बंधन
सोहळ्यांमध्ये उपस्थित राहताना मास्क, सॅनिटायझेशन, व्यक्तिश: अंतर पाळणे गरजेचे असेल. ग्रामीण भागात रात्री ९ वाजताच्या आधी हे सोहळे आटपावे लागणार आहेत. शहरी भागात वेळेचे बंधन नाही.
मंगल कार्यालयांच्या अडचणी वाढल्या
कोरोना प्रोटोकॉलमुळे मात्र मंगल कार्यालय संचालकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे अनेक मंगल कार्यालयांची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. अनेक कर्मचाऱ्यांना काढावे लागले होते. आता पुन्हा त्याच स्थितीची धास्ती वाढली आहे.
.............