गर्दीतील माऊली मुख्यमंत्र्यांना गोंजारते तेव्हा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 08:18 PM2019-08-06T20:18:23+5:302019-08-06T20:20:38+5:30

गर्दीतील एक वृद्ध महिला अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आली. कष्टाने रापलेला आपला खरपूस हात त्यांच्या चेहऱ्यावरून तिने मायेने फिरविला. म्हणाली, ‘बेटा, तुला माझे खूप खूप आशीर्वाद आहेत. तू असंच चांगलं काम कर.’ त्या महिलेच्याही आयुष्यात दु:ख आहे, यातना आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांबद्दल तिला वाटणारी कणव ही शब्दातीत आहे, अव्यक्त आहे.

When Mauli fondled to the Chief Minister in the crowd ..! | गर्दीतील माऊली मुख्यमंत्र्यांना गोंजारते तेव्हा..!

गर्दीतील माऊली मुख्यमंत्र्यांना गोंजारते तेव्हा..!

googlenewsNext
ठळक मुद्देमहाजनादेश यात्रा : भारावलेला क्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्चपदस्थ राजकीय माणसांचे सार्वजनिक आयुष्य एक खुले पुस्तक असते. त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या माणसांच्या गोतावळ्यात सारेच असतात. कुणी स्वार्थापोटी जवळ आलेले तर कुणी निव्वळ प्रेमापोटी ! कसलाही हेतू मनात न ठेवता निव्वळ प्रेमापोटी आलेल्या माणसांच्या निर्व्याज प्रेमाची उधळण खूप मोठे समाधान आणि बळकटी देऊन जात असते.
असाच एक प्रसंग मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनुभवास आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गुरुकुंज मोझरी येथून प्रारंभ झालेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा सुरू झाल्याने त्याकडे सारेच राजकीय चष्म्यातून पाहात आहेत. विरोधकांच्या दृष्टीने ही राजकीय यात्रा असल्याचे म्हटले जात आहे. या यात्रेला राजकीय स्वरूप असल्याचेही मानले जाते, किंबहुना बहुतांश ते खरेही आहे. परंतु या महाजनादेश यात्रेला ठिकठिकाणी मिळत असलेला प्रतिसाद हा राजकारणाच्या पलिकडचा आहे, ही वस्तुस्थिती विरोधकांनीही मान्य करावी, अशीच आहे.
मुख्यमंत्री ज्या गावात, जिल्ह्यात जातात; त्या सर्वच ठिकाणी त्यांना हा प्रतिसाद मिळत आहे. मार्गावरील गावांमधील हजारो माणसं त्यांना आपल्या समस्या घेऊन भेटतात. आपली गाऱ्हाणी मांडतात, प्रश्न सांगतात. मुख्यमंत्रीही त्या प्रश्नांमधील गांभीर्य पाहून ते सोडविण्यासाठी तत्परतेने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करतात. नागपूर, भंडारा, गोंदियात ही जनादेश यात्र सुरू असताना अनेक सामाजिक संघटना, सामान्य माणसांनी भेटून त्यांना समस्या सांगितल्या. गोंदियात सर्वसामान्य माणसांनी मांडलेले प्रश्न अगदी साधे, त्यांच्या रोजच्या जगण्यामरण्याशी संबंधित होते. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर त्यांनी तात्काळ मार्ग काढून दिला. ही यात्रा लवकरच विदर्भाच्या बाहेर जाणार आहे. जनसंवाद साधत असताना मुख्यमंत्री राजकीय स्वरूपाचे नसतातच. तर त्यांना या प्रश्नांची कणव त्यातून दिसते. लोकांचे प्रश्न सोडविताना त्यातून राजकीय लाभ होईल काय, याचाही विचार या पदावरील व्यक्ती करीत नसतात.
सोमवारी हा भावनिक आणि गहिवरणारा प्रसंग घडला. ही यात्रा ब्रह्मपुरी-मूलवरून चंद्रपूरकडे निघाली असताना एका गावात सर्वसामान्य माणसे रस्त्यावर त्यांच्या स्वागतासाठी उभी होती. ही माणसे कुठल्याही राजकीय पक्षाची नव्हती. कुठलेही झेंडे त्यांच्या हातात नव्हते. स्वागताचे फलकही त्यांच्याकडे नव्हते. या गर्दीत लहान मुले होती, महिला आणि वयस्क माणसेही होती. लहान मुलांना मुख्यमंत्र्यांशी भेटायचे होते. तरुणांना बोलायचे होते, सेल्फी काढायची होती, सेकहँड करायचा होता. या गर्दीत एक वृद्ध महिलाही होती. ती अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आली. कष्टाने रापलेला आपला खरपूस हात त्यांच्या चेहऱ्यावरून तिने मायेने फिरविला. म्हणाली, ‘बेटा, तुला माझे खूप खूप आशीर्वाद आहेत. तू असंच चांगलं काम कर.’ त्या महिलेच्याही आयुष्यात दु:ख आहे, यातना आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांबद्दल तिला वाटणारी कणव ही शब्दातीत आहे, अव्यक्त आहे. ती शब्दात मांडता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मागील चार वर्षांत जी कामे केली त्याचा एक भावनिक परिणाम तिच्या बोलण्यात जाणवत होता. एखाद्या आईने आपल्या मुलाला गोंजारावे, त्या ममतेने तिने मुख्यमंत्र्यांना गोंजारले.
या माऊलीला वाटणारा मुख्यमंत्र्यांबद्दलचा जिव्हाळा राजकारणाच्या पलिकडचा आहे. राजकारणातील माणसांना असे प्रसंग फार कमी वाट्याला येतात. असा प्रसंग अनुभवावयास मिळतो तेव्हा त्यांच्या सार्वजनिक जीवनात एक मोठे समाधान लाभत असते. तेच समाधान काल मुख्यमंत्र्यांना मिळाले. ती माऊली जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून मायेच्या ममतेने हात फिरवित होती; गोंजारत होती; बिलगली तेव्हा मुख्यमंत्रीही क्षणभरासाठी भावुक झाले. त्यांनाही गहिवरून आले. हा प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच मनात खोलवर रुजला गेला. या यात्रेतून भारतीय जनता पक्षाला किती फायदा होईल, राज्य सरकारला किती फायदा होईल, हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु लोकांच्या मनात एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल किती चांगल्या भावना असतात, किती चांगल्या भावना असाव्यात, हे या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांना अनुभवावयास मिळाले.

त्या माऊलीने मला दिलेले आशीर्वाद आयुष्यभर सोबत राहणार आहेत. कुठल्याही राजकीय व्यक्तीवर अपेक्षांचे ओझे असते. हे स्वाभाविकही आहे. ते सहज पेलता येऊ शकते. परंतु एखाद्या माऊलीच्या मायेचे ओझे कर्तव्याची आणि लोककल्याणकारी कामाची जाणीव करून देणारे असते. मला मिळालेले मुख्यमंत्रिपद अशाच असंख्य सामान्य माणसांच्या हिताची कामे करण्यासाठी आहे. काल त्या माऊलीच्या आशीवार्दाने मला कामाचे समाधान मिळाले. मला याच दिशेने पुढे जायचे आहे, हा आशीर्वादही मिळाला.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: When Mauli fondled to the Chief Minister in the crowd ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.