लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरून एखाद्या ठिकाणी जायला किंवा लांबच्या प्रवासाला आपण निघालो आणि अचानक मोटरसायकलचे पेट्रोल संपले तर... आणि गाडी बंद पडलेल्या ठिकाणापासून पेट्रोल पंपही लांब असेल तर... तर काय मनस्ताप, किती चिडचीड होते, याचा अनुभव जवळपास प्रत्येकालाच असेल. अशावेळी आपली बाईक दुसऱ्या पर्यायाने किंवा बॅटरीने सुरू करून पुढचा प्रवास करू शकलो तर किती बरे होईल. होय, ते शक्य होऊ शकते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अशाच बाईकची कल्पना प्रत्यक्ष साकार केली आहे जी पेट्रोल आणि बॅटरीवरही चालू शकेल. म्हणजे पेट्रोल संपले की बॅटरीशी जोडून पुढचा प्रवास सुखरूप करू शकू आणि तोही ५२ किलोमीटरपर्यंत.अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मो. इरफान अन्सारी, मो. राशिद, आकाश कुशवाह आणि अमन शेंडे यांनी अशाप्रकारची सुविधा बाईकमध्ये तयार केली असून त्यांनी ‘हायब्रीड इलेक्ट्रिक बाईक’ असे तिला नाव दिले आहे. रामन विज्ञान केंद्राच्या इनोव्हेशन सेंटरच्या वार्षिक इनोव्हेशन महोत्सवात त्यांच्या मोटरसायकलचा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मो. अन्सारी याने सांगितले, इलेक्ट्रिक बाईक बनविण्याच्या उद्देशाने हा प्रयोग सुरू केला पण ही नवनिर्मिती झाली. यामध्ये १३ रो व १३ सिरीज अशी १६९ लिथियम सेलची बॅटरी तयार केली. ती मोटरसायकलच्या इंजिनला कनेक्ट केली. ही बॅटरी वजनाने इतर बॅटरीपेक्षा हलकी तर आहेच, शिवाय वेगाने चार्जही होते. सामान्य बॅटरी ८ तासात चार्ज होते पण ही बॅटरी तीनच तासात फुल चार्ज होते. मोटरसायकलचे पेट्रोल संपले की एका बटणाद्वारे बॅटरीवर तुमची गाडी सुरू होईल. या बॅटरीद्वारे ५० ते ५२ किमीपर्यंत यशस्वीपणे गाडी चालविल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे बाजारात बॅटरीसाठी २० ते २५ हजार रुपये लागतात पण या विद्यार्थ्यांनी केवळ ३ हजार रुपयात ती तयार केल्याचे स्पष्ट केले. पेट्रोलवर गाडी चालत असताना बॅटरी चार्ज होईल, असे तंत्र विकसित करण्यासाठी प्रयत्न चालविले असल्याचे मो. अन्सारीने सांगितले. असे झाले तर प्रवास किती सुकर होईल, याची कल्पना करा.व्हीलचेअर नव्हे, स्ट्रेचर व सायकलही दत्ता मेघे पॉलिटेक्निकच्या खुश वंजारी व तन्मय दुपारे या विद्यार्थ्यांनी मॉडर्न व्हीलचेअर साकारली आहे. गंभीर रुग्ण किंवा अपंगांसाठी ही व्हीलचेअर गरज पडल्यास स्ट्रेचरप्रमाणे आणि सायकलप्रमाणेही उपयोगात आणली जाऊ शकते. इलेक्ट्रिक जोडणीच्या आधारे एक बटण दाबले की स्ट्रेचर आणि दुसऱ्या बटणाने वेळेवर गाडीप्रमाणेही वापरली जाऊ शकते. पाठ, मणका, सांध्याचा त्रास असणारे अथवा अपघातामुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना कुणाच्याही मदतीशिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे जाता यावे, यासाठी ही व्हीलचेअर अत्यंत उपयोगी ठरणारी आहे.संत्र्याची साल दीर्घकाळ टिकवेल ओलावासंत्रा, मोसंबी आणि पेरूच्या सालीमध्ये पेक्टाईन नावाचा घटक असतो. हा घटक सूर्याच्या अतिनील किरणांना सोकून पॉलिमरायझेशन प्रक्रियेद्वारे बॉम्प्लेक्स पॉलिमर अँड पेक्टाईन हा घटक तयार करते. या घटकामध्ये जमिनीत दीर्घकाळ पाणी टिकविण्याची क्षमता असते. मौदाजवळच्या सालवा येथील ग्रामीण विकास विद्यालयाच्या प्राची महल्ले व सृष्टी गायधने या विद्यार्थिनींनी कडुनिंंबाचा पाला व या साली आणि पेक्टाईन पॉलिमरच्या मिश्रणाची भुकटी तयार करून फळझाडांवर याचा यशस्वी प्रयोग केला. ही भुकटी झाडाच्या मुळाशी टाकल्यास एकदा पाणी दिल्यानंतर दोन ते तीन महिने तो ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता मातीत निर्माण होत असल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले. पाणीटंचाईच्या ठिकाणी हा प्रयोग शेतीसाठी वरदान ठरेल असाच आहे.शेतकऱ्यांसाठी ‘मॉडर्न' बुजगावणेशेतात येणारी जनावरे, पशू, पाखरे यापासून पिकांचे, पालेभाज्या अथवा फळभाज्याचे संरक्षण करणे ही शेतकऱ्यांसाठी कायम डोकेदुखी असते. अशावेळी शेतात बुजगावणे ठेवण्याची परंपरा आहे. याच बुजगावण्याला तंत्रज्ञानाची जोड देत बुजगावण्याच्या नाक, कान, डोळ्यामध्ये इलेक्ट्रिकल सायरन बसविले आहे. बुजगावण्याच्या तीन किलोमीटर परिसरात एखादे जनावर आल्यास सायरन वाजणार. शिवाय जनावरावर पाण्याचा फवारा उडविण्याचे तंत्रही त्यात आहे. त्यामुळे भीतीने जनावरे शेतात येणार नाही, अशी या मागची संकल्पना आहे. राजेंद्र हायस्कूल, महालच्या आदित्य शर्मा या विद्यार्थ्याने हे बुजगावणे तयार केले आहे. याशिवाय तेलाच्या घरगुुती पिंपापासून उंदीर पकडण्याचे उपकरणही आदित्यने तयार केले आहे, जे महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.बियाणे रोगमुक्त करणारे घरगुती रसायनबदललेल्या वातावरणात पिकांवर विविध कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव होणे ही शेतकऱ्यांसाठी कायम चिंता वाढविणारी बाब असते. या पिकांवर अशा रोगांच्या आक्रमणाचा परिणाम होणार नाही, यासाठी बियाणेच रोगमुक्त करणारे रसायन चंद्रपूरच्या सरदार पटेल विज्ञान महाविद्यालयाच्या रोशनी नागपुरे व रेणुका मारशेट्टीवार या विद्यार्थिनींनी तयार केले आहे. निलगिरी सालीची भुकटी आणि सिल्व्हर नायट्रेट या रसायनाच्या मिश्रणातून हे रासायनिक द्रव तयार केले असून त्यास ‘ऑरगॅनोकॅलिप्टस’ असे नाव दिले आहे. पेरणी करण्यापूर्वी बियाणे या रासायनिक द्रवात दोन तास भिजवून ठेवायचे व नंतर पेरणीसाठी उपयोगात आणायचे. या बियाणातून उगविलेल्या पिकांवर किडी व रोगांचे आक्रमण झाल्यास त्यांच्या रोग प्रतिकारक क्षमतेमुळे रोगांचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही, असा दावा रोशनीने केला. यावर प्रयोगही केल्याचे तिने सांगितले. यामुळे रासायनिक खतांपासून सुटका मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.मानव-वन्यजीव संघर्ष रोखणारी तोफजंगलालगतच्या असलेल्या गावांमध्ये नेहमी वन्यजीवांचा धोका असतो. वाघ, बिबट अशा हिंस्र प्राण्यांचा मानव व घरच्या जनावरांना धोका तर काही वन्यजीव शेतांचीही नासधूस करतात. वन्यजीव गावात प्रवेश करू नये म्हणून इलेक्ट्रिक तार लावली जाते पण त्यामुळे वन्यप्राण्यांची जीवित हानी होते. अशावेळी वन्यप्राण्यांचे संरक्षणही होईल आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळला जाईल यासाठी नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील मयूर मेहेत्रे यांनी ‘टायगर कॅनॉन’ ही तोफ विकसित केली आहे. यात वायू, पाणी आणि काही रासायनिक पदार्थांचा वापर करून, स्मॉल वेपन बनविले आहे. कुठेही जनावरांचा वावर वाढला, तर त्या भागात या तोफेचा वापर करून, प्राण्यांना अग्नी आणि आवाजाच्या भीतीने पळवून लावता येते. नागपूरलगतच्या काही शेतकऱ्यांनी या टायगर कॅनॉनचा वापर केल्याचेही मयूर यांनी सांगितले.
पेट्रोल संपले की बॅटरीवर चालेल मोटरसायकल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 9:08 PM
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एका बाईकची कल्पना प्रत्यक्ष साकार केली आहे जी पेट्रोल आणि बॅटरीवरही चालू शकेल. म्हणजे पेट्रोल संपले की बॅटरीशी जोडून पुढचा प्रवास सुखरूप करू शकू आणि तोही ५२ किलोमीटरपर्यंत.
ठळक मुद्देरामन विज्ञान केंद्रात इनोव्हेशन फेस्टिव्हल : विद्यार्थ्यांच्या कल्पनांमधून साकारले नवप्रवर्तन