पारशिवनी : नयाकुंड (ता. पारशिवनी) शिवारातील पेंच नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे पुरात वाहून गेले. या पुलावरून वाहनांची सतत वर्दळ असल्याने संरक्षक कठड्यांअभावी या पुलावर माेठा अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने संरक्षक कठडे लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप या भागातील वाहनचालकांनी केला आहे.
ऑगस्टमध्ये संततधार पावसामुळे पेंच जलाशय भरल्याने त्यातील पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पेंच नदीला पूर आल्याने नयाकुंड शिवारातील या नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे वाहून गेले तर याच नदीवरील माहुली शिवारातील पूल खचला. त्यामुळे सावनेर, पारशिवनी व रामटेक तालुक्याला जाेडणारा नयाकुंड शिवारातील एकमेव पूल शिल्लक राहिल्याने या पुलावरून रहदारी वाढली आहे. पुरामुळे हा पूल खराब झाल्याने त्याची दुरुस्ती करणेही गरजेचे आहे.
या पुलाच्या दाेन्ही बाजूला वळण असल्याने वाहनचालकांना पूल लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारात भरधाव वाहन चालकाचा ताबा सुटून पुलावरून नदीत काेसळून माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या पुलाजवळ विद्युत दिव्यांची काेणतीही व्यवस्था नाही. शिवाय, दाेन्ही बाजूंनी साधे सूचनाफलकही लावले नाहीत. ही बाब नागरिकांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, त्यांनी यावर अद्याप काेणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते असंबद्ध उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. परिणामी, या पुलावरील अपघात टाळण्यासाठी येथे तातडीने संरक्षक कठडे लावावे, अशी मागणी पारशिवनीच्या नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, दीपक शिवरकर, सागर सायरे, राहुल ढगे, अनिता भड, आशिष भड, अज्जू पठाण, शेखर शेरकी, अनिकेत निंबाेने यांच्यासह नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.