कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाला नागपुरात कडवे आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेकडे गेल्या चार वर्षांपासून स्वत:ची शहर कार्यकारिणी नाही. पक्षाचे मावळे निष्ठेने काम करताहेत मात्र, त्यांना पद देऊन पदानुसार जबाबदारी सोपविली नाही. त्यामुळे कुठलेही राजकीय नियोजन होताना दिसत नाही. गेल्या चार वर्षात पक्षाचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख बदलत गेले. मात्र, कुणालाही ‘मातोश्री’ वरून कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात यश आले नाही. नवनियुक्त जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनाही तीन महिने पूर्ण झाले. मात्र, ते स्वत:ची टीम नेमू शकलेले नाहीत. आता लोकसभा व विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकारिणी नेमून कार्यकर्त्यांना पदे दिली नाही, त्यांना एकसंघ केले नाही तर शिवसेनेची पार दाणादाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून दक्षिण नागपूरची उमेदवारी न मिळाल्यामुळे शेखर सावरबांधे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे सावरबांधे अपक्ष लढले व त्यांनी शिवसेनेचे उमेदवार किरण पांडव यांच्यापेक्षा जास्त मते घेतली होती. सावरबांधे यांच्यानंतर सतीश हरडे यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना पूर्णपणे विखुरल्या गेली. पुढील अडीच वर्षे हरडे हे शहर कार्यकारिणीसाठी मातोश्रीच्या चकरा मारत राहिले. मात्र, काहीच झाले नाही. शिवसेनेला महापालिकेच्या निवडणुकीला कार्यकारिणीविना सामोरे जावे लागले. त्यामुळे ऐन लढाईत शिवसेनेला जोमाने लढणारे मावळेच मिळाले नाहीत. परिणामी सेनेचे पानिपत झाले. दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.गेल्या साडेतीन वर्षात शिवसेनेचे एकामागून एक संपर्क प्रमुख बदलत गेले. मात्र, एकाही संपर्क प्रमुखाने पक्ष प्रमुखाशी संपर्क साधून कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करून दिले नाही. नागपुरातील कार्यकर्ते मुंबईकडे आशेने पहायचे. मात्र, लवकरच होईल, असे सांगून सबुरीचा सल्ला दिला जायचा. माजी संपर्क प्रमुख आ. अनिल परब यांनी तर शिवसैनिकाला कुठल्याही पदाची गरज नाही, असे वक्तव्य नागपुरात केले होते. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी आपण दोन- दोन पदे घेऊन बसला आहात, अशी आठवण आ. परब यांना करून दिली होती. शेवटी हरडे यांनी कार्यकारिणीची यादी मातोश्रीवर सादर केली होती. मात्र, यादी मंजूर होण्यापूर्वीच हरडे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे काढून घेण्यात आली आणि कार्यकारिणी पुन्हा रखडली.नव्या वर्षाच्या सुरुवातीला १५ जानेवारी २०१८ रोजी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे नागपूर लोकसभा मतदारसंघाची जिल्हा प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली. ग्रामीण भागातील व्यक्तीला शहराची सूत्रे दिल्यामुळे सुरुवातीला नाराजीचे सूर उठले. मात्र, नंतर जाधव यांनी बाजू सावरली. शहरातील विविध प्रश्नांसाठी थेट भाजपाशी लढण्याची आपली तयारी असल्याचे ते उघडपणे बोलू लागले. या लढ्यासाठी त्यांनाही पदाधिकाऱ्यांची फौज हवी होती. जाधव जिल्हाप्रमुख होऊन तीन महिने झाले. मात्र, पूर्णवेळ जिल्हा प्रमुख देऊनही शिवसेनेने अद्याप जाधव यांच्या मदतीसाठी कार्यकारिणी दिलेली नाही. जाधव यांचाही हरडे यांच्यासारखाच एकाकी कारभार सुरू आहे.
शिवसेनेची वाढ खुंटवायची आहे का ?गेल्या चार वर्षात शिवसेना कार्यकारिणी का जाहीर करू शकली नाही, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे. एकीकडे पक्षाचा जिल्हा प्रमुख जाहीर करायचा पण दुसरीकडे त्याला गतीने काम करता येऊ नये, यासाठी कार्यकारिणी रोखून धरायची, असा गेम पक्षातील काही लोक खेळत आहेत, असा आरोप आता कार्यकर्ते करू लागले आहेत. मुंबईतील काही नेत्यांना नागपुरात भाजपाच्या मदतीसाठी शिवसेना वाढूच द्यायची नाही, असा आरोपही आता कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत.
शहर प्रमुखांचे पद रद्द करणारशिवसेनेच्या शहर कार्यकारिणीमध्ये यापूर्वी एक जिल्हा प्रमुख, दोन शहर प्रमुख व प्रत्येक विधानसभेसाठी एक उपजिल्हाप्रमुख नेमले जायचे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारर आता शहर प्रमुख हे पदच गहाळ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांच्यातील दुवा म्हणून शहर प्रमुख काम करायचे.एका शहर प्रमुखाकडे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असायची. मात्र, आता ही व्यवस्थाच संंपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. याचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.भाजप व संघ पदाधिकाऱ्यांनी धरली होती सेनेची वाटमहापालिकेच्या निवडणुकीत भाजपातर्फे तिकीट न मिळाल्याने भाजप व संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा बाण उचलला होता. त्यांनी शिवसेनेकडून रिंगणात उडी घेत थेट भाजपाला आव्हान दिले होते. शहर प्रमुख मंगेश काशीकर यांची यात महत्त्वाची भूमिका होती. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीनंतर अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली. नवा मोठा चेहरा पक्षात दाखल झाल्याचेही पहायला मिळाले नाही.