नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची बैठक केवळ दोन मिनिटांत विसर्जित करण्यात आली व त्यावरून सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. एप्रिल महिन्यात सिनेटची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिले होते. मात्र, अद्यापही त्याबाबत सदस्यांना कुठलीही सूचना आलेली नाही. त्यामुळे बैठक होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठाची अर्थसंकल्पीय ‘सिनेट’ची सभा ११ मार्च रोजी तहकूब करण्यात आली होती व कार्यक्रमपत्रिकेतील उर्वरित मुद्द्यांवरील चर्चेसाठी २१ मार्च रोजी सभा बोलविण्यात आली होती. सकाळी १० वाजता सभेला सुरुवात झाली. मर्यादित सदस्यांची उपस्थिती असताना डॉ. दामोदर सातपुते यांनी अचानक सभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मांडला व डॉ. माहेश्वरी यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर कुलगुरूंनी १०.०२ वाजता सभा विसर्जित होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आलेल्या सिनेट सदस्यांसाठी हा मोठाच धक्का होता. सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत अगोदर कुलसचिव व मग कुलगुरूंना घेराव घातला होता. एप्रिल महिन्यातच बैठक घेऊ, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते.
मात्र, एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला असतानादेखील याबाबत प्रशासनाने कुठलीही पावले उचलली नाहीत. सदस्यांना बैठक कधी होणार काहीच माहिती नाही. विशेष म्हणजे अधिकारीदेखील याबाबत माहिती देण्यास तयार नाहीत. हा आमच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप सदस्यांनी लावला आहे.
राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा
याबाबत सिनेट सदस्य मनमोहन बाजपेयी यांना संपर्क केला असता, त्यांनी अद्यापपर्यंत काहीच कळविण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. राज्यपालांकडे बैठक आयोजित करण्याबाबत परवानगी मागण्यात आली असून, मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. कुलगुरू यावर काहीच बोलायला तयार नसल्याची माहिती एका सिनेट सदस्याने दिली.
आता कुठे गेली आक्रमकता ?
२१ मार्च रोजी सिनेट सदस्य आक्रमक झाले होते. काहीही झाले तरी बैठक व्हायलाच हवी, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता बहुतांश सदस्य मूग गिळून गप्प बसले असल्याचे चित्र आहे. आता त्यांची आक्रमकता कुठे गेली, असा सवाल विद्यापीठ वर्तुळातून उपस्थित होत आहे.