- काव्यजागर : गदिमांना नागपूरकरांनी वाहिली आदरांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मीकी म्हणून ओळखले जाणारे कवी स्व. ग.दि. माडगूळकर यांच्या ४३व्या पुण्यस्मरणदिनानिमित्ताने नागपूरकरांनी त्यांना काव्यजागराद्वारे आदरांजली वाहिली. यावेळी गदिमांचे पुण्यातील स्मारक कधी होणार, असा सवाल उपस्थित करत शासनाचा प्रतीकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला.
धरमपेठेतील वझलवार सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे अशा तऱ्हेचे गदिमांच्या स्मारकाच्या मागणीसाठीचे प्रतीकात्मक शासन निषेधाचे कार्यक्रम सबंध महाराष्ट्रात एकाच वेळी पार पडले. या कार्यक्रमात स्वाती सुरंगळीकर, डॉ. विजया धोटे, योगेश वासाडे, सुनील वाडे, मुकुंद घारपुरे, मधुरा देशपांडे, श्रीकृष्ण चांडक, देवमन कांबळे, राजू डहाके, संजय तिजारे यांनी गदिमांच्या कविता सादर केल्या. श्रीकृष्ण चांडक यांनी गीतरामायणातील काही हिंदी भाषांतरित गीते सादर केली. तत्पूर्वी, ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक व श्रीकृष्ण चांडक यांनी गदिमांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. ज्येष्ठ समाजसेवक गोपाळ कडुकर यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला.
.....