रेशनच्या ३२० पकडलेल्या पोत्यांची कारवाई कुठे थांबली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:25 AM2020-12-16T04:25:50+5:302020-12-16T04:25:50+5:30
नागपूर : दिवाळीच्या एक दिवसापूर्वी कळमना पोलिसांनी बलवंत किराणा या रेशन दुकानावर धाड टाकून रेशनची ३२० पोती जप्त केली ...
नागपूर : दिवाळीच्या एक दिवसापूर्वी कळमना पोलिसांनी बलवंत किराणा या रेशन दुकानावर धाड टाकून रेशनची ३२० पोती जप्त केली होती. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाने चौकशी समिती गठित केली होती. मात्र या प्रकरणात १ महिना लोटल्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. नेमकी कारवाई थांबली कुठे, यासंदर्भात संभ्रम आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एफसीआयच्या गोदामातून रेशनचा पुरवठा वेगवेगळ्या दुकानात करण्यासाठी पुरवठादार वाहन घेऊन निघाले. या पुरवठादाराकडे ऑनलाईन ‘टीपी’ होती. या टीपीवर वेगवेगळ्या दुकानात पुरवठा करायचा असल्याची नोंद होती. मिळालेल्या माहितीनुसार रेशनच्या धान्याची ही पोती बलवंत किराणा दुकानात उतरविण्यात येत असताना, कळमना पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी धाड टाकली. त्यात ही पोती आढळून आली. परंतु रेशनचे हे धान्य असल्याने त्यासंदर्भात चौकशीसाठी अन्नधान्य वितरण विभागाला त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात आला. त्यासाठी विभागाने ५ सदस्यीय समिती गठित केली. परंतु या समितीने अजूनही या प्रकरणी अहवाल दिला नसल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे धान्य एका पुरवठादाराने खरेदी केले होते. ते बलवंत किराणा येथे उतरविण्यात येत होते. पोलिसांची धाड पडल्यानंतर बोगस टीपी बनविण्यात आली. यात पकडलेले धान्य बलवंत किराणा येथीलच असल्याचे दाखविण्यात आले होते.
पण पुढे या प्रकरणात कुठलाही खुलासा विभागाने केला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार रेशन चोरीचे हे मोठे रॅकेट आहे. यात रेशन दुकानदारापासून पुरवठादार, एफसीआयचे अधिकारी, झोन अधिकारी, इन्स्पेक्टर, ट्रान्सपोर्टर या सर्वांचाच समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे.
- समितीकडून अहवाल आलेला नाही
यासंदर्भात अन्न व पुरवठा वितरण अधिकारी (शहर) सवई यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, पोलिसांनी आम्हाला पत्र दिले होते. त्यामुळे या प्रकरणात ५ सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. या समितीकडून अजूनही अहवाल आलेला नाही. समिती जो काही अहवाल देईल, तो पोलिसांच्या सुपूर्द करण्यात येईल. निवडणुकीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याने अहवालाला वेळ लागतो आहे.