पाली विद्यापीठाचे घोडे कुठे अडले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:00 PM2020-09-25T12:00:15+5:302020-09-25T12:02:06+5:30
पाली विद्यापीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे पाली भाषेबाबत दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाली भाषेचे सांस्कृतिक महत्त्व व वारसा विचारात घेता तसेच महाराष्ट्रात पाली भाषेच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या पाहता पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी मागील २० वर्षांपासून साातत्याने लढा सुरू आहे. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरूआहे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणाही केली. परंतु पाली विद्यापीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे पाली भाषेबाबत दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात तसेच भारतात वेगवगळ्या विद्यापीठांमध्ये पाली भाषेचे अध्ययन केले जाते. भारतीय संस्कृतीत भाषेचे दोन प्रवाह अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक पाली व दुसरी संस्कृत. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने संस्कृतच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. संस्कृतची अनेक विद्यापीठे स्थापन केली आहेत. संस्था स्थापन केल्या आहेत. प्राकृतचे विद्यापीठसुद्धा स्थापन झाले आहे. परंतु पाली भाषेच्या विकासासाठी मात्र एकही स्वतंत्र विद्यापीठ नाही. त्यामुळे पालीचे विद्यापीठ व्हावे, यासाठी पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा व आंदोलने करण्यात आली. शासनदरबारी याची दखल घेण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात पाली विद्यापीठाची घोषणाही केली. परंतु पुढे त्याचे काय झाले काही कळायलाच मार्ग नाही.
नागपुरातच व्हावे पाली विद्यापीठ
पाली विद्यापीठ ही काळाची गरज आहे. अनेक देशांमध्ये पालीचे अध्ययन केले जाते. ही प्राचीन भारतीय भाषा असून तिचे संवर्धन व विकासाची गरज आहे. शासनालाही ही बाब मान्य आहे. राज्याचा विचार केल्यास राज्यात पालीचा अभ्यास करणारे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. यात नागपूर व विदर्भातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. तसेच अनेक विदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यामुळे पाली विद्यापीठासाठी नागपूर हे सर्वोत्तम आहे. यासाठी शासनदरबारी मागणी केली जात आहे. यासोबतच राज्यघटनेच्या शेड्यूल्ड आठमध्ये पाली भाषेचा समावेश करावा, पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, पाली अकादमी स्थापन करावी आदी मागण्याही करण्यात आलेल्या आहेत.
-डॉ. बालचंद्र खांडेकर, पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती