मन शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे... उपसकांनी गजबजली दीक्षाभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:23 PM2019-05-18T22:23:43+5:302019-05-18T22:29:14+5:30
वैशाख पौर्णिमेला महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हे साऱ्या जगासाठी बुद्धपर्व आहे. हे बुद्धपर्व शनिवारी नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंचशील ध्वजारोहणाने, बुद्धवंदनेच्या ग्रहणातून, रॅली काढून व सामूहिक प्रवचनांच्या आयोजनातून साजरे झाले. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पवित्र दीक्षाभूमीवर उपासक-उपासिकांनी ‘ बुद्धम् सरणंम् गच्छामी’ या त्रिशरण आणि पंचशीलेच्या जयघोषात शुद्ध आचरण आणि सत्य बोलण्याचा संकल्प केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैशाख पौर्णिमेला महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हे साऱ्या जगासाठी बुद्धपर्व आहे. हे बुद्धपर्व शनिवारी नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंचशील ध्वजारोहणाने, बुद्धवंदनेच्या ग्रहणातून, रॅली काढून व सामूहिक प्रवचनांच्या आयोजनातून साजरे झाले. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पवित्र दीक्षाभूमीवर उपासक-उपासिकांनी ‘ बुद्धम् सरणंम् गच्छामी’ या त्रिशरण आणि पंचशीलेच्या जयघोषात शुद्ध आचरण आणि सत्य बोलण्याचा संकल्प केला. शहरात ठिकठिकाणी व विहारांमध्ये धम्मप्रसाद म्हणून खीर वाटपाचा कार्यक्रम झाला.
शनिवारी पहाटे पासूनच पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये, पंचशीलचा ध्वज हातात घेत बुद्धाचा उपासक आणि बाबासाहेबांचा अनुयायी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी कधी मिरवणुकीने तर कधी जत्थ्याजत्थ्याने येत होता. पांढऱ्या पोशाखातील निळ्या पाखरांच्या थव्यांनी दीक्षाभूमी गजबजून गेली. येथे येणारा प्रत्येक उपासक तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्तुपातील पवित्र अस्थिकलाशाला वंदन करून जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने सकाळीच बुद्धवंदना ग्रहण करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर बुद्ध वंदनेचा अखंड जयघोष सुरु होता. सायंकाळ नंतर दीक्षाभूमीवर गर्दी झाली होती. बहुसंख्य उपासक कुटुंबासमवेत आले होते. अनेकांनी येथे सामूहिक भोजनही केले. दीक्षाभूमीवर बुद्धगीते, भीमगीतांसह पुस्तकांच्या स्टॉलनी गजबजली होती. रात्री उशिरापर्यंत बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर दीक्षाभूमीवरील भव्य स्मारकाची दारे दर्शनासाठी उघडी ठेवण्यात आली होती.