लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिढ्यान्पिढ्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या हातात घटनेचे हत्यार देऊन समाजात ताठ मानेने जगण्यासाठी बुद्ध धम्म दिला. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांनी गर्दी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी सकाळपासून अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी केली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अनुयायी कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर दाखल झाले. दीक्षाभूमीवर स्तुपाकडे जाण्याच्या मार्गावर दुतर्फा पंचशील ध्वज लावले होते. कृतज्ञ अनुयायांनी आपल्या उद्धारकर्त्याला आदरांजली वाहिली. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला अनुयायांनी अभिवादन केले. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीकडे कूच करताना दिसले. सायंकाळीही मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवर लोकांचे जाणे सुरु होते. कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी अभिवादन करण्यासह काही काळ या प्रेरणाभूमीवर घालविला. कुटुंबासह आलेले नागरिक हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसले. अनेकांनी दीक्षाभूमीच्या बाहेरील रस्त्यावर लागलेल्या दुकानांमधून बुद्धमूर्ती, पुस्तकांची खरेदी केली. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर अनुयायांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली.दरम्यान संविधान चौकातही महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या परिसरात विविध संघटनांच्या बैठका व सभाही पार पडल्या. शहरातील विविध बुद्ध विहारांमधून उपासक-उपासिकांची अभिवादन रॅली संविधान चौकात पोहचत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणांनी हा परिसर निनादला होता. बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत अनेकांनी मनोगत व्यक्त केले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संविधान चौकात अनुयायांची गर्दी पहावयास मिळाली.दीक्षाभूमीवर घालविला दिवसमहापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील अनेक नागरिकांनी दीक्षाभूमीवर एकच गर्दी केली. नागरिकांनी अख्खा दिवस कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर घालविला. सोबतच जेवणाचे डबे आणले होते. दीक्षाभूमीच्या परिसरातील हिरवळीवर सतरंजी टाकून अनुयायी कुटुंबासह भोजन करताना दिसले. दिवसभर दीक्षाभूमीवर घालविल्यानंतर सायंकाळी अनुयायी घरी परतले.भजनातून पेरले बाबासाहेबांचे विचार दीक्षाभूमीवर मुरलीधर सूर्यवंशी आणि प्रतिमा सूर्यवंशी या दाम्पत्याने महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिवसभर भजने, भीमगीते सादर केली. भजनाच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांचे विचार पेरण्याचे काम केले. मागील ३० वर्षांपासून सूर्यवंशी दाम्पत्य दीक्षाभूमीवर भीमगीते सादर करून महामानवाचे विचार अनुयायांमध्ये पेरण्याचे काम करीत आहे. दरम्यान अंबाझरीच्या धम्मदीप गायन पार्टीतर्फे गायक मनोज निकाळजे, राहुल पाटील, राजेंद्र वाहणे, धीरज निकाळजे, गणेश जयगडी, नामदेव पखाले, अभिषेक मसराम, उमेश बागडे व संचाने अनुयायांचे मनोरंजन केले. ‘तुझीच कमाई आहे भीमाई...कबिरा कहे ये जग अंधा.....तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं...’अशी गाणी सादर करून त्यांनी अनुयायांमध्ये बाबासाहेबांचे विचार पेरले.