कुजबूजसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:21+5:302021-07-19T04:07:21+5:30
कोरोनामुळे प्लॅटफार्मवर गर्दी होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये केले. प्रवाशांची तपासणी करूनच ...
कोरोनामुळे प्लॅटफार्मवर गर्दी होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये केले. प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना रेल्वेस्थानकात सोडण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केलेली धडपड कुणीही समजू शकतो. परंतु प्रसारमाध्यमांना रेल्वेस्थानकात जाण्यास बंदी घालून रेल्वे प्रशासन काय साध्य करत आहे, हे मात्र समजण्याच्या पलीकडे आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हा तुघलकी निर्णय लागू करून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना रेल्वेस्थानकात प्रवेश देऊ नका, असा आदेशच दिला आहे, तर दुसरीकडे मात्र चोरटे बिनधास्त रेल्वेस्थानकाच्या परिसरात प्रवेश करून प्रवाशांच्या महागड्या साहित्यावर डल्ला मारत आहेत. रेल्वेस्थानकातील अव्यवस्थेवर बोट ठेवून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रसारमाध्यमे वृत्तांकन करतात. मात्र प्रसारमाध्यमांच्या रेल्वेस्थानकावरील बंदीबाबत आग्रही भूमिका घेत असतानाच रेल्वेस्थानकात सहज प्रवेश करीत असलेल्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासन भूमिका का घेत नाही ? अशी कुजबूज उपराजधानीतील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये सुरू आहे.
-दयानंद पाईकराव
...................