लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर / मौदा : रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास एक लाखाची खंडणी मागणारा कथित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रविनिश पांडे ऊर्फ चिंटू महाराज अद्यापही मौदा पालिसांच्या हाती लागला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस त्याचा शोध घेत असताना तो चक्क शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत दिसून आला. अद्यापही त्याला अटक न झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.शिवसेना उपजिल्हा प्रमुख व कार्यकर्ते असल्याचे सांगत रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास एक लाखाची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार मौदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी ट्रक मालक राजेश वैरागडे (रा. भंडारा) यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रविनिश पांडे याच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविनिश पांडे याचा शोध घेण्यासाठी मौदा पोलीस स्टेशनेचे पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मनोहर जंगवाड व दोन पोलीस शिपायांचे पथक रविनिश पांडे याच्या घरी शोध घेण्यासाठी गेले असता तो युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेला गेला असल्याची माहिती मिळाली. पांडे ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमालादेखील उपस्थित होता. त्यावेळी त्याने सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची भेटदेखील घेतली. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यामध्येदेखील तो कैद झाला. परंतु पोलिसांना दिसू शकला नाही. आम्ही त्याला सभेतून अटक करु शकलो नाही. परंतु आरोपी लवकरच सापडेल, असा दावा पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांनी केला आहे.
‘त्या’ सेना पदाधिकाऱ्याला ‘आशीर्वाद’ कुणाचा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:20 PM
एक लाखाची खंडणी मागणारा कथित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रविनिश पांडे ऊर्फ चिंटू महाराज अद्यापही मौदा पालिसांच्या हाती लागला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस त्याचा शोध घेत असताना तो चक्क शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत दिसून आला.
ठळक मुद्देपोलीस शोधात, रविनीश पांडे यात्रेत : अटक कधी होणार ?