९० हजार मोकाट कुत्री कोण आवरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:06 PM2018-03-28T22:06:41+5:302018-03-28T22:37:52+5:30

उपराजधानीतील बेवारस कुत्र्यांची संख्या ८० ते ९० हजारवर पोहोचली आहे. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Who will be able to control 90 thousand stray dogs? | ९० हजार मोकाट कुत्री कोण आवरणार?

९० हजार मोकाट कुत्री कोण आवरणार?

Next
ठळक मुद्देनागपूरकर दहशतीत : मनपाकडे सक्षम यंत्रणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील बेवारस कुत्र्यांची संख्या ८० ते ९० हजारवर पोहोचली आहे. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मागील चार-पाच वर्षांपासून मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम नावासाठी सुरू आहे. गेल्या वर्षभरात जेमतेम १३७ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन आॅफ क्रुएलटी अ‍ॅनिमल व व्हेस्टस् फॉर अ‍ॅनिमल (सातारा) या दोन संस्थांवर नसबंदीची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने घेतला होता. या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली होती. परंतु शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया सुरूच झाली नाही. शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत नसबंदी केली जात होती. परंतु दिवसाला जेमतेम एका कुत्र्यांवर नसबंदी व्हायची. त्यामुळे मारव्हा एसपीसीएल या संस्थेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु या संस्थेकडे सक्षम यंत्रणा नसल्याने नसबंदीचा आकडा दहाच्या पुढे गेलेला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नियोजनाचा अभाव
बेवारस कु त्र्यांवर नसबंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. परंतु या दृष्टीने कोणत्याही स्वरुपाचे नियोजन करण्यात आलेले नाही. महापालिकेने भांडेवाडी येथे शस्त्रक्रिया गृह सुरू केले आहे. तीन कंत्राटी डॉक्टरांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु नियोजन व यंत्रणेचा विचार करता हा उपक्रम यशस्वी होण्याची शक्यता दिसत नाही. मनुष्यबळ व निधीचा अभाव असल्याने हा उपक्रम कागदोपत्रीच राबविला जात आहे.
मेयो, मेडिकल परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट
मेडिकल व मेयो तसेच प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रुग्णालयाच्या परिसरात गटगटाने मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. रात्रीच्या सुमारास रुग्णालय परिसरात या कुत्र्यांची दहशत असते. अनेकदा चावा घेण्याच्या घटना घडतात. मेडिकल व मेयो परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिकेला अनेकदा पत्रे दिली. परंतु यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

मनपाची सक्षम यंत्रणा नाही
 शहरातील बेवारस कु त्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया क रण्यासाठी महापालिकेने भांडेवाडी येथे व्यवस्था केली आहे. परंतु  कु त्र्यांना पकडून  वाहून नेण्यासाठी कर्मचारी नाही. शस्त्रक्रिया केंद्रात आवश्यक सुविधा नसल्याने शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या कुत्र्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे ज्या काही कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत, त्यातील ५० टक्केच  यशस्वी होत आहे. दुसरीकडे सुविधा नसल्याने कुत्र्यांच्या जीवालाही धोका असल्याचा विविध संघटनांचा आरोप आहे.

 लोकसहभाग वाढविण्याची गरज 
शहरातील मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रि या करण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नाही. त्यांच्या पद्धतीने कामकाज सुरू आहे. शस्त्रक्रिया केंद्रातही सुविधा नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच शस्त्रक्रियेच्या कामात अनेकांचा हस्तक्षेप वाढला आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. महापालिकेने यंत्रणा सक्षम करून यात लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. त्याशिवाय हा उपक्रम यशस्वी होणार नाही. 
स्मिता मिरे, सेव्ह स्पिचलेस अ‍ॅनिमल आॅर्गनायझेशन

नसबंदीला सुरू  केल्याचा दावा
शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या विचारात घेता गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या १३७ शस्त्रक्रीया खूप कमी आहे. याचा विचार करता मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठी तीन कंत्राटी पशुचिकि त्सकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सोमवारी भांडेवाडी येथे शस्त्रक्रीया केंद्र सुरू करण्यात आल्याची     माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.  गेल्या  काही वर्षात शस्त्रक्रीया उपक्रम बंद असतानाही  २०१४ ते २०१७ या कालावधीत १० हजार ३९७ कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

Web Title: Who will be able to control 90 thousand stray dogs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.