बावनकुळेंना कोण देणार टक्कर? काँग्रेसपुढे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:58 AM2019-07-23T11:58:38+5:302019-07-23T11:59:17+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे कृपाल तुमाने यांना २४ हजार ४६४ मतांची लीड देणाऱ्या कामठी मतदार संघात भाजपने विधानसभेत चौकार मारण्याचा महासंकल्प केला आहे.

Who will give a fight to Bawankulae? Big challenge before Congress | बावनकुळेंना कोण देणार टक्कर? काँग्रेसपुढे मोठे आव्हान

बावनकुळेंना कोण देणार टक्कर? काँग्रेसपुढे मोठे आव्हान

Next
ठळक मुद्देवंचित कुणाचा करणार घात?

जितेंद्र ढवळे /सुदाम राखडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे कृपाल तुमाने यांना २४ हजार ४६४ मतांची लीड देणाऱ्या कामठी मतदार संघात भाजपने विधानसभेत चौकार मारण्याचा महासंकल्प केला आहे. राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात सुरुंग लावताना काँग्रेसला गटबाजीने घाम फोडला आहे. त्यामुळे कामठीत बावनकुळेंना टक्कर कोण देणार, असा प्रश्न काँग्रेस नेतृत्वाला पडला आहे. आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येते. मात्र यावेळी येथे राष्ट्रवादीकडून दावा ठोकण्यात आला आहे. युतीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे एकमेव उमेदवार आहेत. त्यांना पक्षात येथे कुणीही स्पर्धक नाही.
कामठीत वंचित बहुजन आघाडी आणि बसपाचा उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपाच्या मतातील अंतर येथे स्पष्ट होईल. समाजवादी पार्टीच्या उमेदवाराचेही अस्तित्व येथे दखल पात्र राहील. इकडे बरिएमं भाजपसोबत असल्याने अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांची कामठीत महत्त्वाची भूमिका राहील.
या मतदार संघाचे राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता, भाजपासाठी हा मतदार संघ ‘सेफ’ मानण्यात येतो. गत तीन निवडणुकीत येथे काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असल्याने, यावेळी या जागेवर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर येथे घड्याळाचा गजर करण्यास इच्छुक आहेत.
दुसरीकडे पक्षसंघटन मजबूत नसले तरी या मतदार संघात काँग्रेसचे दावेदार अनेक आहेत. कॉँग्रेसकडून येथे प्रदेश पदाधिकारी कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, शिवसेनेला जय महाराष्ट्र करून कॉँग्रेस पक्षात आलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर कंभाले, युवा नेते प्रसन्ना तिडके, नागपूर जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे महासचिव आबीद ताजी, युवक कॉँग्रेसचे कामठी विधानसभा उपाध्यक्ष फिरोज अन्सारी यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर येथे सज्ज आहेत. गत दोन निवडणुकीतील पराभव लक्षात घेता यावेळी उमेदवार स्थानिकच हवा, अशी पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी आहे. २००९ मध्ये पराभव झाल्यानंतर सुनीता गावंडे आणि २०१४ च्या पराभवानंतर राजेंद्र मुळक यांनी येथून कायमची एक्झिट घेतली आहे. असे असले तरी स्थानिक उमेदवारालाही उमेदवारी मिळविताना पक्षांतर्गत गटबाजीचे अग्निदिव्य पार पाडावे लागणार आहे. भाजपाला रामराम ठोकून कॉँग्रेसमध्ये आलेले काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनाही ऐनवेळी काँग्रेसची येथे उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही! यासाठी दोन निवडणुकीचा इतिहास येथे साक्षीदार आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या कामठी नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. तालुक्यात तीन जि.प. सदस्य काँग्रेसचे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत बसपाने येथे ऐनवेळी माघार घेतली होती. यावेळी बसपाकडून कामठी नगर परिषदेच्या नगरसेविका रमा नागसेन गजभिये या उमेदवार राहू शकतात.
समाजवादी पार्टीकडून प्रदेश महासचिव परवेज सिद्धीकी किंवा माजी नगराध्यक्षा माया चौरे रिंगणात उतरू शकतात. दलित, मुस्लीम आणि बहुजन मतदारावर डोळा असलेली वंचित बहुजन आघाडी येथे कुणाला उमेदवारी देणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र काँग्रेसच्या उमेदवारीपासून ‘वंचित’ राहिलेला नेता येथे ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी नगरसेवक प्रमोद कांबळे यांचे येथे वंचितकडून नाव पुढे करण्यात आले आहे. कामठी विधानसभा क्षेत्रात कामठी तालुका, मौदा तालुका व नागपूर ग्रामीण तालुक्यातील खरबी, हुडकेश्वर व नरसाळा जि.प. सर्कलचा भाग मोडतो.
बावनकुळेंचे प्रभावी अस्त्र जनसंवाद
मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथे नियमित जनता दरबार आणि गावोगावी जनसंवाद हे दोन प्रभावी माध्यम निवडले आहेत. जनता दरबारमध्ये समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे निराकरण होईपर्यंत ते फॉलोअप घेत असतात. तशी कार्य पद्धती त्यांनी विकसित केली आहे. यासोबतच गावोगावी होणाºया जनसंवाद सभेत शासकीय यंत्रणा प्रत्येक गावात नेऊन तिथेच नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्याचे कौशल्य त्यांनी विकसित केले आहे. मतदारांशी थेट संपर्क ही बावनकुळे यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. गत १५ वर्षांत कामठी मतदार संघाचा लूक बदलविण्याचे मोठे श्रेय चंद्रशेखर बावनकुळे यांना जाते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनातून गत साडेचार वर्षांत कामठी मतदार संघात ३,३९६.२९ कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत.
विजयी चौकाराचे लक्ष्य
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन राज्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा ४० हजार ०२ मतांनी पराभव करीत बावनकुळे यांनी कामठीत विजयाची हॅट्ट्रिक केली होती. २००९ मध्ये त्यांनी कॉँग्रेसच्या तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांचा ३१ हजार ९३ मतांनी पराभव केला होता. २००४ च्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांचा ७ हजार मतांनी पराभव करीत कामठीत कमळ फुलविले होते. यानंतर येथे भाजपचा विजयरथ कायम आहे. त्यामुळे यावेळी विजयाचा चौकार हे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे.

Web Title: Who will give a fight to Bawankulae? Big challenge before Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.