सौरभ ढोरे
काटोल : ३ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमुळे काटोल तालुक्यातील राजकीय पारा चढला आहे. तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायतीची पोटनिवडणूक ५ ऑक्टोबर रोजी होत असल्याने आधी बाजार समितीचा गड काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल व भाजपचे शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनल आमोरासमोर आहे. राजकीय दृष्टीने महत्त्वाची असलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही पॅनलचे उमेदवार मैदानात उतरले आहेत.
काटोल कृषी बाजार समितीमध्ये सहकार क्षेत्रातून ११, ग्रामपंचायत क्षेत्रातील ४ उमेदवार, व्यापारी-अडते क्षेत्रांतील २, तर मापारी-हमाल गटातील एक अशा १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गत ९ वर्षांपासून बाजार समितीवर राष्ट्रवादी समर्थित पॅनलचे वर्चस्व आहे. सुरुवातीच्या काळात सभापती पदावरून अनेक कुरघोड्या पाहायला मिळाल्या. शेवटी राष्ट्रवादीने तारकेश्वर शेळके यांच्याकडे धुरा सोपवीत याला विराम लावला होता. भाजप ही निवडणूक नगरपरिषदेचे सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात लढत आहे. भाजप बाजार समितीच्या विकासाचा जाहीरनाना घेऊन मतदारापुढे जात आहे. दुसरीकडे सत्तापक्ष झालेल्या विकासावर व भविष्यातील नियोजन यांची आखणी करून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. शेळके यांच्या टीममध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, निळकंठ ढोरे, अजय लाडसे ही टीम मैदानात उतरली आहे. ठाकूर गटात माजी सभापती दिनेश ठाकरे, शेतकरी जिनिंग-प्रेसिंगचे अध्यक्ष नितीन डेहनकर, संचालक विनायक मानकर निवडणूक रिंगणात आहेत. ठाकूर, डेहनकर व मानकर यांच्यावरील आक्षेपाने ते निवडणुकीतून बाहेर झाले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या निवडणुकीत आणखी रंगत आली आहे.
---
केदार कुणासोबत?
सुनील केदार हे महाविकास आघाडीत असून त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांना उमेदवारीसुद्धा देण्यात आली आहे; परंतु ठाकूर गटाने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात सहकारमहर्षी बाबासाहेब केदार मार्केट यार्ड काटोल बाजार समितीला देण्याचे आश्वासन दिल्याने केदार नेमके कुणासोबत? हा प्रश्न मतदारांना पडला आहे.
230921\img-20210923-wa0124.jpg
फोटो कृषी बाजार समिती काटोल