नागपूर : काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापले असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात भोंगे हे आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून आहेत. महाराष्ट्रात तर भाजपची सत्ता असतानादेखील भोंगे होतेच. भाजपशासित राज्यांतील भोंग्यांबाबत मौन बाळगून महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा सुरू आहे. सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. मंगळवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, रात्री १० वाजेनंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. या आदेशांचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
सरसंघचालकांनी पीओकेमध्ये शाखा लावावी
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, १५ वर्षांत अखंड भारत होईल. या वक्तव्याचे स्वागत व समर्थन करतो. सत्तेत नसताना आश्वासन दिले जाते, सत्तेत असताना करून दाखवावे लागते. सत्ता स्वयंसेवकांकडे आहे, तर त्वरित पावले उचलली गेली पाहिजे. ७ वर्षांत काश्मीरमधील हिंदूंना परत आणता आले नाही. आता एका महिन्यात त्यांना परत आणावे, तसेच सरसंघचालकांनी स्वत: एक रात्र तरी काश्मीरमधील हिंदूंसोबत राहावे, तसेच सरकारने पीओकेवर ताबा मिळवावा व सरसंघचालकांनी तेथे जाऊन शाखा लावावी, असा चिमटा डॉ. तोगडिया यांनी काढला.
रिक्त पदे त्वरित भरा
केंद्र व राज्य शासनात एक कोटी पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरण्यात यावी. जर असे झाले नाही तर बेरोजगारांना एकत्रित करून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. तोगडिया यांनी दिला. ज्यांनी ई-श्रम कार्ड तयार केले आहेत, त्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनाने दरवर्षाला सहा हजार रुपये टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.