लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कलावंत हे केवळ पश्चिम महाराष्ट्रातच राहतात, गैरसमजाने म्हणा वा राजकीय नेतृत्वांच्या शहाणपणाने सांस्कृतिक विभागाकडून अनावधानाने विदर्भाकडे दुर्लक्षच केले. मात्र, जेव्हा हाच विभाग काही बाबतीत विदर्भाची बाजू लावून धरतो, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील कलावंतांना मिरची झोंबत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. गडेकर दांपत्याच्या निवडीवरून असाच वाद निर्माण करण्याचे प्रयत्न मुंबई, पुणे आदी क्षेत्रांतील कलावंत करत आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नुकतीच नाट्यनिर्मिती संस्थांना नव्या नाट्यनिर्मितीसाठी अनुदान मंजूर करणारी नाट्यपरीक्षण निवड समिती (व्यावसायिक, संगीत व प्रायोगिक) स्थापन केली आहे. या समितीवर २२ जणांची निवड झाली आहे. ही घोषणा २२ जानेवारीला झाली. या समितीत नागपूरचे प्रख्यात अभिनेते, लेखक व दिग्दर्शक नरेश गडेकर व त्यांची पत्नी आसावरी तिडके-गडेकर आणि वाशिमचे उज्ज्वल देशमुख यांची निवड झाली आहे. आतापर्यंत अशा महत्त्वांच्या समितीवर विदर्भातून कोणत्याच कलावंतांची निवड होत नव्हती. तो अनुशेष या तिघांच्या निवडीने दूर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र, तेथील काही राजकीय कलावंतांकडून गडेकर दांपत्याच्या निवडीवर सवाल उपस्थित केला जात आहे. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांची निवड हाेऊच कशी शकते, असे ताशेरे ओढले जात आहेत. या विषयावर वाद निर्माण करणे म्हणजे विदर्भाकडे तुसड्या नजरेनेच बघण्यासारखे झाले आहे.
निवडीसाठी मी वशिला लावला नव्हता : नरेश गडेकर
खरे सांगायचे तर या निवडीसाठी मी कोणालाही वशिला लावला नव्हता. माझी निवड या समितीवर झाली, हेसुद्धा घोषणा झाल्यावरच कळले. आसावरी आणि माझे नाट्यक्षेत्रात स्वतंत्र काम आहे. यासाठी आम्ही दोघेही एकमेकांचा आधार कधीच घेत नाहीत. एकाच कुटुंबात आहोत म्हणून असा आक्षेप घेणे ही काेतेपणाची वृत्ती प्रदर्शित करते. यावर काय निर्णय घ्यायचा तो सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घ्यावा, असे मत नरेश गडेकर यांनी व्यक्त केले.
..........