आगारातील एकूण बस ८६
कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या २२६
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या १२४
खेडेगावात जाण्यासाठी खासगीचा आधार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटीची वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे; परंतु सध्या ग्रामीण भागात हव्या तशा फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना ग्रामीण भागात जाण्यासाठी खासगी चारचाकी, अवैध वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने शहराप्रमाणे ग्रामीण भागातही फेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
बहुतांश बसचा प्रवास फक्त शहरांचाच !
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीच्या बस हळूहळू रस्त्यावर येत आहेत; परंतु ग्रामीण भागात प्रवाशांची संख्या हवी तेवढी नसल्यामुळे सध्या ग्रामीण भागात पूर्णपणे बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर १२४ फेऱ्यांच्या माध्यमातून एसटीच्या बसने ९ लाख ६५ हजार ७७० किलोमीटरचे अंतर पार केले. त्या माध्यमातून एसटीच्या गणेशपेठ आगाराला २ कोटी २९ लाख ९०६४८ रुपये उत्पन्न मिळाले. सध्या गणेशपेठ आगारातून शहरात २२६, तर ग्रामीणमध्ये फक्त १३४ फेऱ्या जातात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात ९२ फेऱ्या कमी धावत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
टाकळघाटसाठी फेऱ्या वाढवाव्यात
‘सध्या टाकळघाट, शिवा अडेगाव येथे दिवसातून एकच बस येते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे या भागात बस फेऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.’
-मारोती कसंबे, प्रवासी
खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो
‘ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. काटोल भागातील लोहगड, लिंगा लढाई येथे दिवसातून एकच बस येते. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.’
-प्रशांत जाधव, प्रवासी
लवकरच फेऱ्या सुरू करू
‘विद्यार्थ्यांची वाहतूक पूर्णपणे सुरू न झाल्यामुळे ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. इतर ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू आहेत. लवकरच फेऱ्या कमी असलेल्या ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू करण्यात येतील.’
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
..............