नागपूर - राज्यात मराठा आरक्षणावरुन रणकंदन होत असून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गुरुवारी महाराष्ट्राच्या विधिमंडळात चर्चा झाली. त्यावेळी, सर्वच आमदारांनी आणि मंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली. तर, ओबीसी आमदार तथा नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी असे बोलून दाखवले. याचवेळी, विधानसभेत ओबीसींचे दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध भिडल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र हा तमाशा बघायला आहे का, कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी भुजबळांना सुनावलं.
ओबीसी नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळांवर तोफ डागली. छगन भुजबळ यांच्याकडून महाएल्गार सभांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला एकत्र आणून आरक्षणाच्या मुद्दयावरुन भडकावले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होत असून मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी सभागृहात बसून मागण्या मान्य करुन घ्यायला हव्यात, जनतेनं तुम्हाला त्यासाठीच सभागृहात पाठवलं आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी भुजबळांना लक्ष्य केलं.
ओबीसी समाजासाठी तुम्ही मागण्या करत आहेत, सरकारवर आरोप करत आहात. भुजबळसाहेब, तुम्ही आरोप करताय. पण, जे मिळवायचा अधिकार तुम्हाला दिलाय, तो अधिकार मिळवा. अन्यथा खुर्चीला लाथ मारण्याची हिंमत दाखवा. मागायचा अधिकार माझा आहे, कारण मी विरोधातला आहे. विरोधी आमदारांना मागण्याचा अधिकार आहे. पण, ज्यांना द्यायचा अधिकार आहे, ते मागत बसलेत, कटोरा घेऊन. दे .. बाबा के नाम पे देदे... भगवान के नाम दे... अल्लाह के नाम दे... ईश्वर के नाम दे... कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा?, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेतून विचारला.
भुजबळ विरुद्ध जरांगे... सकाळी उठल्यापासून एकमेकांवर बोलायला लागतात. अरे, महाराष्ट्र तुमचा हा तमाशा बघायला आहे का?, असा परखडत सवालही वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान, अंबड येथील पहिल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात स्वत: विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळांच्या नेतृत्त्वात ओबीसींचा महाएल्गार होत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, त्या सभेला उपस्थित राहून त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर भूमिकाही मांडली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि महाएल्गार सभेत, किंवा भुजबळांसोबत या मुद्द्यावर व्यासपीठ शेअर करणार नसल्याचं म्हटलं.