लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचारात होते नव्हते ते सर्व खर्च झाले. उपचार सुरू असताना पोटच्या मुलामुलींनी ढुंकूनही पाहिले नाही. मृत्यूनंतर ते येतील, अंत्यसंस्कार करतील, या भाबड्या आशेवर गरीब वडील होते. परंतु यासाठीही त्यांनी नकार दिला. पत्नीच्या जाण्याच्या दु:खापेक्षा आप्तेष्टांनी दिलेल्या नकाराचे दु:ख त्या वडिलांना डोंगराएवढे भासत होते. रुग्णालयाच्या बेडवर मृतदेह आणि ३०० किलोमीटर दूर गाव, खिशात केवळ ५० रुपये, काय करावे, या चिंतेत ते होते. याची माहिती मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाला मिळताच ते धावून आले. तेच त्यांचे नातेवाईक झाले. अंत्यस्कारही पार पाडला.
नलिनी बोरकर, वय वर्ष ६१ त्या मृत महिलेचे नाव. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका खेडेगावातील ही महिला. कुटुंबात दोन विवाहित मुले आणि एक विवाहित मुलगी. नातवंडांचा गोतावळा आणि जीवापाड प्रेम करणारा पती. एक सामान्य आर्थिक पार्श्वभूमी असलेला परिवार. पण मागील एका वर्षापासून नलिनीचे पती किशनराव बोरकर पत्नीच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत होते. आणि शेवटी निदान झाले, पत्नीला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने घेरल्याचे. पूर्वीच आर्थिक स्थिती कमकुवत आणि त्यात हा आजार. कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांनी नलिनीबाबत अपेक्षा सोडून दिल्या होत्या. खुद्द नलिनीदेखील होणाऱ्या त्रासापासून जणू ईश्वराशी मृत्यूच दान मागत होत्या.
परंतु पतीने जिद्द सोडली नव्हती. आपल्याला करता येईल तेवढे सर्वच करायचे, असे त्यांनी ठरविले होते. घरापासून जवळपास ३०० किलोमीटर दूर हे दाम्पत्य सोबतीला तिसरा कुणाचाच आधार नसताना मेडिकलला पोहचले. उपचार सुरू झाले. परंतु नियतीला मान्य होते तेच झाले. तिचा मृत्यू झाला. तिच्या जाण्याने किशनराव ढसाढसा रडले, पण ही वेळ रडण्याची नव्हती. गावाकडे फोन करून त्यांनी आपल्या मुलाला, मुलीला त्यांच्या आईचा निधनाची वार्ता दिली. परंतु त्यांनी मृतदेह घेऊन जाण्यास आणि अंत्यसंस्कारास नकार दिला. खिशात होते नव्हते सर्व पैसे उपचारासाठी खर्च झाले.
आता रिकाम्या खिशाने गावाकडे हा मृतदेह न्यायचा तरी कसा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पत्नीच्या जाण्याच्या दु:खापेक्षा आपल्या आप्तेष्टांनी दिलेल्या नकार त्यांना बोचत होता. याची माहिती मेडिकलमधील समाजसेवा विभागाला मिळाली. त्यांनीही कुटुंबीयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. जिथे तिच्या जाण्याचे कुणाला दु:ख नाही तर तिथे नलिनीला नेण्यात काय अर्थ आहे? असे म्हणत शेवटी येथेच नलिनीवर अंत्यसंस्कार करण्याचा पतीने निश्चय केला. यात मेडिकलचे सामाजिक अधीक्षक श्याम पांजला, प्रदीप पडवी, अधिराज सोमकुंवर, सेवा फाऊंडेशनचे प्रतिनिधी पुरुषोत्तम भोसले, स्नेहांचल संस्थेच्या इंद्रायणी पवार यांनी पुढाकार घेतला. शवविच्छेदनगृहातून मृतदेह घाटावर नेण्यापासून ते अंत्यसंस्कार पार पाडून घराकडे परतण्यासाठी या सर्वांनी एक आप्त म्हणून मदत केली.