वन्य पशू संरक्षण दिन; वनातील संघटित गुन्हेगारी केव्हाही काढू शकते डोके वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 09:34 AM2020-10-07T09:34:40+5:302020-10-07T09:34:59+5:30
Wildlife Nagpur News वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात वनातील संघटित गुन्हेगारी आता थंडावली आहे. मात्र ती संपली असे समजून चालणार नाही. ती केव्हाही डोके वर काढू शकते, असा धोक्याचा इशारा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिला आहे.
वन्य पशू संरक्षण दिनानिमित्त ‘लोकमत’शी ते बोलत होते. ते म्हणाले, वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.
वन्यजीवांना माणसांपासून धोका असल्याचे सांगताना ते म्हणाले, शेतकऱ्यांकडून आणि शिकाऱ्यांकडून जंगलात तसेच श्ोतशिवारात शिकारीसाठी सापळे लावले जातात. यात रानडुकरांसोबत मोठे प्राणीही अडकतात. शेतकऱ्यांचा हेतू वन्यजीव मारण्याचा नसला तरी धोका येथेच होतो.
मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका अधिक आहे. शेतकºयांवर प्राण्यांचे हल्ले वाढले की या घटना घडतात. नागरिकांचा रोष वाढतो. जंगलात तसेच शेतशिवारात विष प्रयोगाच्या घटना घडतात, परिस्थिती स्फोटक बनते. मात्र वनविभागाचे कर्मचारी अशा प्रसंगी योग्य समन्वय राखतात. त्यामुळे बरेचदा यातून योग्य मार्ग निघतो.
वन्यजीवांच्या रक्षणासाठी लवकरच शीघ्र बचाव पथक स्थापन केले जाणार आहे. जखमी आणि आजारी प्राण्यांना तातडीने सेवा मिळावी यासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर अधिक सक्षमतेने उभारणे आणि त्यांची संख्या वाढविण्याचा हेतू आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी गुन्हेगारांचा पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी अधिक मनुष्यबळ उभारण्याची आणि यंत्रणा सक्षम करण्याची वनविभागाची योजना आहे. सध्या प्रायमरी रिस्पॉन्स टीम कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून नियमित कामे होत आहेत. निरीक्षणासाठी अद्ययावत कुटी उभारण्याचे नियोजन आहे. वन्यजीव मित्र संकल्पना अमलात आली असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिकारी टोळ्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये एसटीटीएफ कार्यरत आहे. त्यात अधिक वाढ करणे, त्यांना प्रशिक्षीत करणे, प्रशिक्षणासाठी इमारत उभारणे ही कामे केली जाणार आहेत.
वन्यजीवांचे रक्षण करणे ही मानवाची जबाबदारी आहे. त्यासाठी सहजीवन स्वीकारणे हाच पर्याय आहे.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)